कर्जत - किकवीच्या जंगलात आढळला महिलेचा मृतदेह

हेमंत देशमुख
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कर्जत - कर्जत तालुक्यातील कशेळे-लोभेवाडी परिसरात माळरानावर पुरलेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह महिलेचा असून कुजलेला असल्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  या महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलिसांकडून खुनाचा संशय व्यक्त होत आहे. 

कर्जत - कर्जत तालुक्यातील कशेळे-लोभेवाडी परिसरात माळरानावर पुरलेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह महिलेचा असून कुजलेला असल्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  या महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलिसांकडून खुनाचा संशय व्यक्त होत आहे. 

कर्जत तालुक्यातील लोभेवाडीच्या बाजूला असलेल्या माळरानावर येथील तरुण क्रिकेट खेळण्यास जातात. नेहमी प्रमाणे क्रिकेट खेळायला गेलेल्या तरुणांचा चेंडू सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील झाडीत गेला. तो शोधायला गेलेल्या तरुणांना खड्यात हाड सदृश्य काहीतरी दिसले. दुर्गंधी येत असल्याने त्यांनी गावकऱ्यांना ही बाब सांगितली. गावकर्यांनी पाहिल्यावर हे काहीतरी वेगळं प्रकरण असल्याचे गावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांना कळताच कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रात्र झाली असल्याने दुसऱ्या दिवशी कारवाईला सुरवात करण्यात आली. ज्या ठिकाणी मृतदेह गाडण्यात आला होता तो खड्डा पोलिसांनी पूर्ण खोदला. त्यावेळेस त्या खड्यातून कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

मृतदेहाची पाहणी करून हा एक महिलेचा मृतदेह असून वय 30 ते 40 पर्यंत असावे असा अंदाज येथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी लावला. मात्र अशी कोणती महिला परिसरात हरवली असल्याची तक्रार दाखल नसल्याने हीखुनाची घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महिलेच्या मृतदेहावर मिळून आलेल्या तावीजवरून ही मुस्लिम महिला असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात आली.

कर्जत तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती मोठ्या प्रमाणात उदयास आली आहे. तालुक्याला निसर्गाने भरभरून निसर्गसमृद्धी प्रदान केली आहे. 5 ते 6 मोठमोठ्या नद्या त्यामुळे हिरवा निसर्ग, गर्द झाडी, यामुळे मुंबई, गुजरात, दिल्ली अशा अनेक ठिकाणच्या लोकांनी कर्जत कडे आकर्षित होऊन फार्म हाऊस निर्माण केले आहेत. सुट्यांच्या काळात किना मौजमजा करायला या फार्म हाऊसचा वापर केला जातो. एकट्या कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4500 फार्म हाऊस आहेत. तेव्हा इथे कोण येत ? काय करत ? हा देखील प्रश्न आहे. सदर महिलेच्या मृतदेहाबाबतीत देखील अशाच कोण्या फार्म हाऊस वर त्या महिलेला मारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लोभेवाडीच्या वर्दळशून्य माळरानावर पुरली असल्याची शक्यता अधिक आहे. 

यावेळी घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नलकूल, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे नायब तहसीलदार सुधाकर राठोड नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव व कर्जत पोलिसांची टीम उपस्थित होते. कर्जत पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून अज्ञात महिलेच्या खुनाचा दाखल केला असून अधिक तपस कर्जत पोलीस करीत आहे.

Web Title: Karjat - The body of the woman found in Kikavi forest