कर्जत-कल्याण रस्ता सहा तास बंद राहणार

कर्जत-कल्याण रस्ता सहा तास बंद राहणार

नेरळ (बातमीदार) : कर्जत विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली असून, १३ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दरम्यान, कर्जत मतदारसंघात तब्बल ७०.८१ टक्के म्हणजे लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाले असून, वाढलेले मतदान कोणाचे पारडे जड करते, यावर सध्या खलबते सुरू आहेत. मतमोजणी केंद्र हे कर्जत-कल्याण राज्यमार्गालगत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हा रस्ता सकाळी ८ पासून दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

कर्जत विधानसभा मतदारसंघात १ लाख ९८ हजार ८४५ मतदारांनी हक्क बजावला. या मतदारसंघात २ लाख ८२ हजार २४७ मतदार आहेत. ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी २४ ऑक्‍टोबरला कर्जत-कल्याण रस्त्यालगत शेळके मंगल कार्यालयात होणार आहे. मतमोजणीसाठी शेळके मंगल कार्यालयाच्या तळमजल्यावर यंत्रणा सज्ज झाली आहे. याच मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि अन्य साहित्य तेथे बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले आहे. त्याचवेळी त्या सर्व रूमवर सीसीटीव्हीचे जाळे असून, नागालॅंड पोलिसचे रायफलधारी कमांडोंची सुरक्षा असून, शेळके मंगल कार्यालय परिसरालाही छावणीचे स्वरूप आले आहे. बाहेरचा कोणताही व्यक्ती स्ट्रॉंग रूम परिसरात जाऊ शकत नाही, अशी सुरक्षा व्यवस्था तेथे ठेवली आहे. मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांना मोबाईल फोन घेऊन येता येणार नाही. मतमोजणी केंद्र रस्त्यालगत असल्याने रस्त्यावरील वाहनांना सकाळी 8 पासून दुपारपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

२४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी 
मतदारसंघात ३२६ मतदान केंद्रे असून, केंद्रीय निर्वाचिन आयोगाच्या नियमानुसार १३ टेबल मतमोजणीसाठी लावण्यात आले आहेत. २४ फेरी कर्जत विधानसभा मतदारसंघात होणार असून, मतमोजणीची सुरुवात पोस्टल मतांनी होणार आहे. देशाच्या सुरक्षेत जे 63 मतदार आहेत, त्यांची प्राप्त झालेली मते यांचीही मोजणी होईल. नंतर साधारण ८.३० वाजता कर्जत तालुक्‍यातील खांडस जिल्हा परिषद प्रभागापासून मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली. २४ फेऱ्यांमध्ये होणारी मतमोजणी साधारण १ वाजता पूर्ण होईल. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन यांची नियमानुसार मोजणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com