बॅंक समजून फोडले ग्रामपंचायत कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 डिसेंबर 2017

कर्जत - चोरांनी मोठा हात मारण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच फसला. बॅंक समजून त्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयच फोडले. दरम्यान, याची कुणकुण लागताच गावातील तरुणांनी चोरांवर हल्लाबोल केला. एकाला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. मात्र त्याचा साथीदार पसार झाला. मिरजगाव येथे काल रात्री हा प्रकार झाला. दिगंबर किसन ससाणे (वय 24, वाटलूज, ता. दौंड) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.

नगर-सोलापूर रस्त्यालगत मिरजगाव येथे ग्रामसचिवालयाची इमारत आहे. तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, रुक्‍मिणी बॅंक, त्याखाली सीना परिसर पतसंस्था, अशी कार्यालये आहेत. तेथील बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा फोडून मोठा हात मारण्याचा बेत दोघांनी आखला. ठरल्याप्रमाणे काल रात्री एक जण दुसऱ्या मजल्यावरील बॅंक फोडण्यासाठी गेला. दुसरा तळमजल्यावर पाळत ठेवत बसला.

गावातील काही तरुण बाहेरगावाहून आले होते. त्यांना तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीचा संशय आला. तरुणांनी त्यास पकडले. त्याने दुसऱ्या मजल्यावर आपला साथीदार महाराष्ट्र बॅंक फोडायला गेल्याचे सांगितले. तरुणांना ही माहिती समजताच त्यांनी वरच्या मजल्याकडे मोर्चा वळविला. त्या वेळी एका चोरट्याने पलायन केले. मात्र त्याने बॅंक समजून ग्रामपंचायत कार्यालयच फोडल्याचे गावकऱ्यांचे लक्षात आले. तरुणांनी पकडलेल्या एकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

Web Title: karjat mumbai news crime