कर्जत-पुणे रेल्वे सेवा कधी सुधारणार?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍याची मागणी प्रवाशांनी आणि प्रवासी संघटना करत आहेत.

बोरघाटात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्या आधी मालगाडी घसरल्याने कर्जत-लोणावळा दरम्यान सेवा खंडित झाली होती. यावर्षी रेल्वे प्रशासनाने २८ जुलैपासून ९ ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद ठेवली होती. केवळ काही महत्त्वाच्या एक्‍स्प्रेस गाड्या चालवल्या होत्या. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही बदलले होते. तर काही ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. विना अडथळा कामे पूर्ण करण्यावर मध्य रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे; परंतु ती कामे आजही सुरू आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्याचे सत्र आजही कायम आहे. 

सध्या पुणे-पनवेल-भुसावळ गाडीचा मार्ग बदलला आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस ही गाडी पुण्यावरून चालवली जाते. प्रगती एक्‍स्प्रेस रद्द आहे, तर इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा कर्जत थांबा रद्द केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता दिवाळीही कर्जत-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासदायक ठरली आहे. कर्जत-लोणावळा मार्गादरम्यान बोरघाटात दोन वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे दक्षिण-पूर्व घाटात दुरुस्तीची कामे करण्यासाठी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार असल्याने परिणामी रस्ते मार्गाची वाहतूक मंदावण्याची शक्‍यता आहे.

कर्जतपासून लोणावळा हा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील घाट सेक्‍शन समजला जातो. बोरघाटातील दक्षिण-पूर्व या घाटात जून महिन्यात घडलेल्या अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कटली होती. सध्या मध्य रेल्वेने बोरघाटात दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

मला व्यवसायानिमित्त दररोज पुण्याला जावे लागते; पण आता गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे पुण्याला गेल्यावर पुन्हा कर्जतला येऊ याची खात्री नाही.
- नितीन परमार, प्रवासी

मध्य रेल्वेकडून करण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामाबद्दल आम्ही सतत पाठपुरावा घेत असतो. त्यात प्रवाशांचे हाल कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
- केतन शाह, अध्यक्ष, कर्जत पॅसेंजर असोसिएशन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat-Pune Railway running issue