बंडखोर राहिले मुंबईत सुरक्षित

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन आठवडे अत्यंत चतुराईने पार पाडल्याने कर्नाटकात सरकार कोसळले.

सरकार कोसळले कुमारस्वामींचे; वजन वाढले प्रसाद लाडांचे
मुंबई - कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन आठवडे अत्यंत चतुराईने पार पाडल्याने कर्नाटकात सरकार कोसळले.

कर्नाटक सोडून सुरक्षित आश्रयाच्या शोधात असलेल्या या बंडोबांना वांद्रे परिसरातील सोफीटेल, हे स्थान जाहीर झाल्यावर वर्दळीपासून दूर असलेले पवईतील रनेसान्स, नंतर गोव्याला पोचविण्याच्या प्रयत्नात मध्येच सातारा अन्‌ नंतर पुन्हा रनेसान्स या परिसरात ठेवून न्यायालयीन डावपेचांसाठी नवी दिल्लीत नेण्यापर्यंतच्या भूमिका प्रसाद लाड यांनी लीलया पार पाडल्या, असे बोलले जाते. "ऑपरेशन लोटस'चा मुंबई अध्याय अत्यंत काटेकोरपणे पार पाडणारे युवक नेते मोहित कंबोज ऊर्फ भारतीय, नगरसेवक मुरजी पटेल आणि आता प्रसाद लाड सध्या पक्षात कौतुकाचा विषय ठरले आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न जोगेश्‍वरी परिसरातील मातोश्री क्‍लबच्या परिसरातून झाला होता. या वेळी याच भागात पवई तलावाच्या रम्य परिसरात असलेल्या रनेसान्स या हॉटेलचा उपयोग करण्यात आला. सोफीटेल या वांद्य्रालगतच्या हॉटेलाबाहेर माध्यमांनी डेरा दिल्यावर नजर चुकविण्यासाठी आधी रनेसान्सचा मार्ग पकडला. तेथे शिवकुमार यांना भेटीची संधी मिळू न देणे, हा या संपूर्ण प्रकरणातला महत्त्वाचा अध्याय मानला जातो आहे.

शिवकुमार यांची भेट झाली असती, तर किमान सहा आमदार परत वळविण्यात त्यांना यश मिळाले असते, असे मानले जाते. एकही आमदार फितूर होणार नाही, याची काळजी काटेकोरपणे घेतली गेली. ते मोहिमेतले दुसरे यश होते, असे एका माहीतगाराने सांगितले.

आमदारांना मुंबईत आणण्यापासून तर नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात पोचविण्यापर्यंत कळीची भूमिका प्रसाद लाड यांनी निभावली, असे समजते. त्यांचे पक्षातले वजन यामुळे वाढल्याचेही मानले जाते. "ऑपरेशन लोटस'मुळे त्यांचे हे विशेष स्थान वधारले आहे.

पक्षाला आणि नेत्यांना मध्ये न आणता गेले चार महिने बंडखोर नगरसेवकांचा पाहुणचार मुंबईत सुरू होता, असे समजते. सीप्झ अंधेरी परिसरातील नगरसेवक मुरजी पटेल यांनी गेले जवळपास वर्षभर या आमदारांच्या आवभगतीकडे लक्ष दिले, असे समजते.

भाजपचे कानावर हात
आमचा या घटनाक्रमाशी कोणताही संबंध नाही, असे सांगत महाराष्ट्र भाजपने कानावर हात ठेवले असले; तरी कॉंग्रेसने मात्र ही भाजपची खेळी असल्याचे वारंवार नमूद केले आहे. प्रसाद लाड यांच्याशी यासंबंधी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. ते न्यायालयाशी संबंधित कामासाठी दिल्लीत गेले असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Government Collapse Rebel MLA Secure Mumbai Politics