डोंगरची काळी मैना बाजारात दाखल 

विजय पगारे
शनिवार, 19 मे 2018

इगतपुरी - डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे इगतपुरीतील दुर्गम आणि कसारा घाटाच्या आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे आदीवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. 

इगतपुरी - डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे इगतपुरीतील दुर्गम आणि कसारा घाटाच्या आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे आदीवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. 

चैत्र महिन्यापासुन या आंबट गोड करवंदांच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद घडेघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. या भागातील करवंदे मुंबई ,कल्याण ,नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. 

करवंदाचे आरोग्यदायी लोणचे
आंब्याचा मोसम सुरू होण्यापुर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदा पासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. करवंदांचे लोणचे आरोग्यदायी मानले जाते मधुमेह, रक्तदाब अपचन, हायपर अॅसिडीटी असणाऱ्यांना हे लाभदायक असते. काही वर्षापूर्वी या भागातील महीला बचत गटांनी करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता. मात्र पाहीजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने बाळसं धरण्यापूर्वीच हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरुण व महीलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो असेही बोलले जाते. 

रखरखत्या उन्हात डोंगरची काळी मैना, चारं सध्या मोठ्या प्रमाणात विकली जात असून, यातून अनेकांच्या हातांना रोजगार मिळाला आहे. डोंगर रांगांत करवंद ,चारं यांची मोठी झाडी आहेत उन्हाळ्यात हा रानमेवा बहरतो. स्थानिक लोक रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात या व्यवसायातून त्यांची रोजी- रोटी भागते. करवंद दिडशे ते दोनशे रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. घरबसल्या मिळणाऱ्या या रानमेव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड जंगलतोड आणि वणव्यांमुळे करवंदाची झाडं दिवसेंदिवस कमी होत आहेत. गेल्या 2O वर्षाच्या तुलनेत करवंदाची झाडे मोठ्या संख्येने घटली आहेत या भागातील डोंगरची काळी मैना सध्या सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आंबट -तुरट चवीचा हा रानमेवा चाखण्यासाठी करवंदाच्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगीतले पूर्वी वाट्यावर मिळणारा हा रानमेवा आता दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे.

जंगलात उगवणाऱ्या या  गावरान मेव्याच्या शोधासाठी पहाटे पासुन लगबग करावी लागते. ग्राहकांना रानमेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही तयार असतो आणि त्यातुन आम्हाला हक्काचे दोन पैसे मिळतात याचेही समाधान लाभते.
- कचराबाई आगिवले, विक्रेती महिला चिंचलेखैरे

Web Title: karvand in market