कसारा घाट बनतोय मृत्यूचा सापळा! 

नरेश जाधव
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कसारा घाट रस्त्याला उतरती कळा लागली असून रस्त्याला तडे जाणे, रस्ता खचणे, दगड मातीचा मलबा रस्त्यावर येणे यामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक रखडत आहे. दररोज 10 ते 12 तास वाहने एकाच ठिकाणी उभी रहात असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

ठाणे : गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कसारा घाट रस्त्याला उतरती कळा लागली असून रस्त्याला तडे जाणे, रस्ता खचणे, दगड मातीचा मलबा रस्त्यावर येणे यामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक रखडत आहे. दररोज 10 ते 12 तास वाहने एकाच ठिकाणी उभी रहात असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

दुर्घटनांमुळे घाटाची अवस्था राम भरोसे असून कधी कुठून रस्ता खचेल व दरडी कोसळतील, हे सांगता येत नसल्याने येथून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालवताना सतर्कता बाळगा...कसारा घाट रस्ता डगमगत चालला आहे, असेच आवाहन करण्याची वेळ आली आहे. 

कसारा घाट रस्ता खचल्याने मुंबई-नाशिक वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. या मार्गावरील वहातूक नवीन घाटातून नाशिक-मुंबई वाहिनीवर वळवण्यात आली. त्या वाहिनीवर देखील सध्या रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडत असून, दुरुस्ती न झाल्याने त्याचे भगदाड झाले...एकीकडे जुन्या घाट रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा ताण वाढत असताना तोच ताण नवीन घाट रस्त्यावर येऊन उभा राहिला. 

पावसाळा सुरू झाला की दरड कोसळून वाहतूक कोंडी होणे आणि अपघात घडणे हे दरवर्षीचे रडगाणे आहे. मात्र यावर प्रशासन ठोस उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचे अशा घटनांमधून समोर येत आहे. यंदाच्या पावसात तर खचलेला रस्ता पाहून संबंधित यंत्रणेची दाणादाण उडाली असून, वाहनचालकांनाही जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागतात. 

केबलचा घाटाला धोका 
जुन्या कसारा घाट रस्त्याची डावी बाजू ही दरीच्या बाजूने निघाली आहे. याच दरीतून वळवळणाचा रेल्वे मार्ग आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दरडी व डाव्याबाजूचा रस्ता रेल्वे मार्गावर धडकला तर मोठी दुर्घटना घडू शकते. अनेक वर्षांपासून नेटवर्किंग कंपनीच्या केबल टाकण्यासाठी घाट रस्त्याच्या एका बाजूने जेसीबीद्वारे खोदाई करण्यात येते. केबल टाकल्यानंतर चर बुजवण्यात येतात. त्यामुळे पावसाचे पाणी आतमध्ये झिरपून घाट रस्त्याला धोका निर्माण होतो 

पोलिसांची त्रेधातिरपिट 
नाशिक-मुंबई घाट रस्ता तीव्र उतार आणि नागमोडी वळणाची आहे. सध्या या मार्गावरूनच दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. त्यामुळे लहान वाहनांना जागा शोधत मार्ग काढावा लागतो. खबरदारी म्हणून वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी कसारा पोलिस आणि महामार्ग पोलिसांची त्रेधातिरपिट उडाली आहे. सध्या एकाच मार्गाने वाहतूक सुरू असल्याने 3/4 किमीच्या लांबच लांब रांगा लागल्या असून रोज हेच दृश्‍य दिसते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasara Ghat is becoming a death trap!