कसारा घाटात ट्रक दरीत कोसळला, दैव बलवत्तर म्हणून वाचले तिघांचे प्राण

नरेश जाधव
Tuesday, 17 November 2020

मुंबईहून नाशिकच्या दिशेनं शेणखत घेऊन निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळून थरारक घटना घडली. हा अपघात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील हिवाळा पुलाजवळ झाला.

मुंबईः  काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशी आपल्याकडे म्हण आहे. याचाच अनुभव ऐन दिवाळीच्या भाऊबीज आणि पाडव्याच्या दिवशी मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात आला आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेनं शेणखत घेऊन निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळून थरारक घटना घडली. हा अपघात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील हिवाळा पुलाजवळ झाला. दैव बलवत्तर यात जीवितहानी झाली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडीहून एमएच १५ इजी ५९२२ क्रमांकाचा ट्रक शेणखत घेऊन नाशिक जिल्ह्यातील ओझर शहराकडे निघाला होता. दोन प्रवासी नाशिकला जाण्यासाठी त्यातून प्रवास करत होते. दरम्यान कसारा घाटाच्या चढणीला लागल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेचा कठडा तोडून खोल दरीत कोसळला.

अधिक वाचा-  बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया: अजित पवार

अपघाताची माहिती मिळताच नाशिक महामार्ग पोलिस आणि पीकइन्फ्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेतली. सर्वत्र अंधार असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. यावेळी महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझडे आणि कसारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर डगळे, फौजदार माधव पवार, राजेंद्र जाधव, हरिश्चंद्र गुजरे, राहुल गांगुर्डे, कैलास गोरे, केतन कापसे, संतोष माळोदे, उमेश चौधरी पीकइन्फ्रा कंपनीतील कर्मचारी आणि कसारा गावातील तरुणांच्या मदतीने दरीत उतरले.

अधिक वाचा-  भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बॅटरीच्या प्रकाशावर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकासह दोन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यात चालक भाऊसाहेब भदादे गंभीर जखमी झाले असून प्रवासी भागवत पाठक, राहुल कुलकर्णी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने इगतपुरी शासकीय रुग्णालयात हलविले.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kasara A truck crashed into 100 feet deep ravine near Old Kasara Ghat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasara A truck crashed into 100 feet deep ravine near Old Kasara Ghat