
कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2206 कोटी जमेचा अर्थसंकल्प गुरुवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका सभागृहात सादर केला.
KDMC Budget : केडीएमसीचा 2206 कोटीचा अर्थसंकल्प सादर; आरोग्य सेवा व शहर स्वच्छता, सौंदर्यकरणावर भर
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2206 कोटी जमेचा अर्थसंकल्प गुरुवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका सभागृहात सादर केला. मागीलवर्षी 1773 कोटी जमेचा अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला होता. त्यापैकी 1675 कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 1387 कोटी विविध विकासकामांवर खर्च करण्यात आले असून सध्या पालिकेकडे 287 कोटी शिल्लक आहेत. मागील वर्षाच्या जमा खर्चाच्या तुलनेत यंदा 432 कोटी रुपयांनी पालिका प्रशासनाने वाढ केली आहे. अपूर्ण कामांना प्राधान्य देणारे, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन यावर भर देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
आरोग्य सेवांवर भर...
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. महसुली खर्चाअंतर्गत आरोग्य व्यवस्थेसाठी 34 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांत अत्याधुनिक सेवा सुविधा आत्तापर्यंत उभ्या करण्यात प्रशासनाला यश आले आहे. डायलिसीस सुविधा, अतिदक्षता विभाग, नागरि आरोग्य केंद्र, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर याचा लाभ नागरिक घेत आहेत.
भविष्यात डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी सुतिकागृह तसेच कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. पीपीपी तत्वावर ते उभारण्यात येणार आहे. सुतिकागृहात पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत सुविधा असतील तर इतर रेशन कार्ड धारकांना शासनाच्या सुविधांचा लाभ त्या ठिकाणी घेता येतील. महापालिका क्षेत्रात दोन मोठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. 68 ठिकाणी हेल्थ वेअरनेस सेंटर सुरु करण्याचा पालिकेचा विचार आहे.

स्वच्छ सुंदर शहर...
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत महसुली खर्चाकरीता रक्कम 94 कोटी व भांडवली खर्चाअंतर्गत 67 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शहर कायमस्वरुपी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी घनकचऱ्याचे विलगीकरण, तो जमा करणे, त्याची वाहतूक व त्यावर प्रक्रीया करणे या सर्व बाबींत अमुलाग्र बदल करण्यात येणार आहे. आधारवाडी येथे साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रीया करुन ती जागा मोकळी करण्यासाठी 119 कोटीचा डीपीआर शासनाकडे सादर करण्यात आला होता. यातील 42.47 कोटी कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच मांडा येथे 150 टि.पी.डी. क्षमतेचा घनकचरा प्रकल्प राबविणे.
प्राथमिक शिक्षण...
वेतन भत्त्यासह महसूली खर्चा अंतर्गत 70.38 कोटी व भांडवली खर्चाअंतर्गत 1.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत शैक्षणिक सुविधांसोबतच मनपा उर्दु शाळा बनेली येथे मुले व मुलींचा फुटबॉल संघ तयार करण्यात आला आहे.. नेतीवली येथे व्हॉलीबॉल संघ तर सापाड येथे कुस्ती प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात 5 शाळांत क्रिडा साहित्य स्टोअर रुम तयार करण्यात येणार आहेत. डिजीटल क्लासरुम शाळांत तयार करण्यात येणार आहेत.
स्मशानभूमीत मोफत अंतिम संस्कार...
स्मशानभूमींसाठी अर्थसंकल्पात महसुलीखर्चांतर्गत 3 कोटी व भांडवली खर्चांतर्गत 4 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांच्या घरातील कोणाचा मृत्यु झाल्यास त्यांच्यावर सामाजिक बांधिलकी या जाणिवेतून महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या अंतविधीचा खर्च उचलण्यात येणार आहे. लाकडांवर 5 हजारांचा होणारा नागरिकांचा खर्च यामुळे वाचणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
सावळाराम क्रिडा संकुलाचे खासगीकरण...
महापालिकेचे डोंबिवलीतील क्रिडासंकुल हे बाह्य यंत्रणांना चालविण्यास देण्याचा पालिकेचा मानस आहे. नामांकित क्रिडाखेळाडूंना ते चालविण्यास दिल्यास खेळाडूंना होणार असून गुणवंत खेळाडू येथून घडतील. त्याचबरोबर क्रिडासंकुलाच्या देखभाल दुरुस्तीवर पालिकेचा होणारा खर्चात कपात होणार आहे.
उत्पन्न वाढीचे नियोजन
अनिवासी पाणीपट्टीत वाढ...
अनिवासी पाणीपट्टीमध्ये पालिकेने काही अंशी वाढ केली आहे. व्यापार, वैद्यकीय क्षेत्रास होणाऱ्या पाणीपट्टीत अत्यंत कमी प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सर्वे दरम्यान पालिकेच्या अशी गोष्ट लक्षात आली होती की 10 टक्के मालमत्ता या प्रॉपर्टी टॅक्सच्या यादीत नाहीत. तर काही मालमत्ता धारक हे रहिवासी टॅक्स भरुन व्यावसायिक कारणासाठी वापर करत आहेत. तर काही मालमत्ताधारक अधिक एरीया वापरुन पाणी वापर करत आहेत. या सर्व मालमत्ता धारकांना मालमत्ता टॅक्स नेट मध्ये घेऊन मालमत्ता करात देखील वाढ करण्याचा पालिकेचा मानस आहे.
यासोबतच रस्त्यावर पार्कींग पॉलिसी राबविणे, जाहीरात फी, बाजार परवाना फी, बाजार फी स्थानिक संस्था कर यांच्या माध्यमातून कर आकारणी करुन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
प्रत्येक प्रभागात मोबाईल टॉयलेट
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोहने येथे एकाच ठिकामी मोबाईल टॉयलेट आहे. तेही नादुरुस्त असल्याने एकाच ठिकाणी उभे आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागांत 10 सीटचे एक मोबाईल टॉयलेट खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.
महसुली जमेचा रुपया
विशेष अधिनियमाखालील वसूली – 28.66 टक्के
मालमत्ता कर, पाणी पुरवठा, मलप्रवाह, लाभकर, ड्रेनेज टॅक्स, उपयोगकर्ता शुल्क, शासकीय कर – 27.19 टक्के
वस्तू व सेवाकरावरील अनुदान – 18.28 टक्के
मालमत्ता उपयोगिता, परवाने, सेवा शुल्क व इतर – 10.70 टक्के
मुद्रांक शुल्क फी – 6.40 टक्के
पाणी पट्टी – 5.14 टक्के
शासन अनुदाने व अंशदाने – 2.27 टक्के
संकिर्ण जमा (व्याज, निविदा, फॉर्मसह) – 1.11 टक्के
स्थानिक संस्था कर - 0.25 टक्के
महसुली उत्पन्नातून खर्च बाबी व त्याचे खर्चाशी प्रमाण
अस्थापना व प्रशासकीय खर्च – 43.14 टक्के
पाणी पुरवठा, मलःनिसारण व जलनिःसारण – 12.44 टक्के
बांधकाम, विद्युत व इतर – 11.91 टक्के
सार्वजनिक आरोग्य - 11.03 टक्के
प्रकल्प कर्ज परतफेड – 6.06 टक्के
प्राथमिक शिक्षण - 6.01 टक्के
परिवहन उपक्रम - 4.86 टक्के
संकीर्ण खर्च – 2.51 टक्के
शहरी, गरीब, महिला बालकल्याण, दिव्यांग, क्रिडा – 2.04 टक्के
निवडणुकीसमोरील कामे
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विशिष्ट समाजाला खूष करण्यासाठी शासनाच्या मूलभूत सुविधांतर्गत अनुदानातून कल्याण लोकसभा हद्दीत कल्याण पूर्वेतील उत्तर भाषकांची संख्या विचारात घेऊन नेतिवली येथे उत्तर भारतीय भवन, चक्कीनाका येथे शिवाजी महाराज स्मारक, डोंबिवलीत आयरे गाव येथे दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी सभागृह उभारणे, निळजे खाडीकिनारा सुशोभिकरण, कल्याणमधील बैलबाजार भागातील गोविंदवाडी रस्ता पुनर्पृष्ठीकरण, चक्कीनाक ते मलंग रस्ता, सावळाराम महाराज संकुल ते टाटा पाॅवर रस्ता ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.