कचराप्रश्‍नी महापौरांचा रुद्रावतार 

कचराप्रश्‍नी महापौरांचा रुद्रावतार 

कल्याण - अस्वच्छ शहराचा शिक्का बसलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा समस्येने नागरिक त्रस्त होते; आता प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे पालिकेतील पदाधिकारीही त्रस्त झाले आहेत. मिशन स्वच्छता हाती घेतलेल्या महापौर विनिता राणे पद स्वीकारल्यापासून कचरा समस्येचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत; परंतु प्रशासनातील अधिकारी पुढे करत असलेली कारणे ऐकूण त्यांनाही रुद्रावतार धारण करावा लागला. बुधवारी (ता. 5) महापौरांसह शिवसेना गटनेते रमेश जाधव, जेष्ठ नगरसेवक विश्‍वनाथ राणे यांनी आधारवाडी डम्पिंगची पाहणी केली. या वेळी समस्यांविषयी पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांवर असमाधानी असलेल्या महापौरांनी कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापौर विनिता राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. मे महिन्यात स्वच्छता मोहीम राबवत त्यांनी त्याची सुरुवातही केली. त्याचवेळी आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडवण्यासाठी वारंवार तिथे भेटीही दिल्या. या विषयाच्या खोलात गेल्यावर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव त्यांना आला. सफाई कामगार, मुकादम, सॅनिटरी इन्स्पेक्‍टर यांच्या पातळीवर असलेल्या कामाच्या उदासिनतेमुळे ही समस्या "जैसे थे' असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. 

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी एकच रस्ता आहे. या रस्त्याचे काम सुरू आहे; परिणामी गाड्यांची वाहतूक संथ गतीने होत आहे. शहरात रोज 600-700 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा कचरा गोळा करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही फार मोठे आहे. याचबरोबर गाड्यांचे नियोजनही व्यवस्थित नाही. काही नगरसेवक आपल्या प्रभागांत जास्त गाड्या वापरत असल्याचेही या वेळी निदर्शनास आले आहे. सध्या डम्पिंग ग्राऊंडवर रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र यातही पालिकेच्याच दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने येथे कचरा वाहून आलेली गाडी त्वरित रिकामी होईल, यावर आता कटाक्षाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डम्पिंग ग्राऊंडजवळ असणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या आवारातून मोठ्या क्रेनच्या सहाय्याने गाडीतील कचरा उचलता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे. 

अहवाल सादर करण्याचे आदेश 
कचऱ्याच्या गाड्यांसाठी तीन कोटींचा इंधन खर्च होतो; तर याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला 5.5 कोटींचा खर्च होतो. या गाड्यांच्या कामकाजावर नियंत्रण रहावे, यासाठी या सर्व गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे काय निरीक्षणे नोंदविली, याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नसल्याचे वास्तवही या वेळी समोर आले. पालिकेने मोठा गाजावाजा करत कॉल ऑन डेब्रिजची घोषणा केली होती. या कामासाठी तब्बल एक कोटी 80 लाख रुपयांचा ठेका दिला गेला होता. प्रत्यक्षात या ठेकेदाराने काय काम केले? असा प्रश्‍न शहरातील रस्त्यांवर फिरताना पडतो. या ठेकेदाराकडून अन्य कामे करून घेण्यात आल्याची सारवासारव पालिका अधिकाऱ्यांनी केली; मात्र या उत्तराने समाधानी नसल्याचे सांगत महापौर विनिता राणे यांनी त्यांना या कामाचा पूर्ण अहवाल सादर करा, असे निर्देश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com