रस्ते मोकळे ठेवण्याच्या विनंतीचा मान ठेवा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्वाणीचा इशारा

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्वाणीचा इशारा
ठाणे - ठाण्यातील रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी आहेत. ते अडवून ठेवू नका. शहरामध्ये रस्ते रुंद होत असताना त्यांच्यावर मनमानीपणे बस्तान बसवून सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका. मी फेरीवाल्यांच्या, रिक्षावाल्यांच्या विरोधात नाही; मात्र नागरिकांसाठी उभारलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करत असाल तर तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला कराल तर त्याचे प्रत्युतर दिले जाईल. आमच्या विनंतीचा मान ठेवून शहरातील रस्ते नागरिकांसाठी मोकळे ठेवा; अन्यथा मोठ्या कारवाईशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, अशा शब्दांमध्ये ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील फेरीवाले, रिक्षाचालक आणि बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशी पालिका आयुक्त थेट रस्त्यावर उतरून त्यांनी स्थानक परिसर, वर्तकनगर, घोडबंदर परिसर या भागामध्ये फेरफटका मारून नागरिक, रिक्षाचालकांशी संवाद साधत शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

ठाणे शहरामध्ये महापालिका आयुक्तांनी सुरू केलेली फेरीवालाविरोधी कारवाई शनिवारी सुटीच्या दिवशीही कायम ठेवली. महापालिका आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू ठेवली होती. ठाणे रेल्वेस्थानक परिसर, घोडबंदर रस्ता आणि शास्त्रीनगर या भागांमध्ये त्यांनी फेरफटका मारून पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी अत्यंत आक्रमकपणे बेशिस्त वागणाऱ्यांची थेट कॉलर पकडणारे आणि अंगरक्षकांकडून मारहाण करवणारे आयुक्त शनिवारी पूर्णपणे मवाळ दिसून येत होते. रिक्षाचालक आणि नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांसाठी रस्ते मोकळे ठेवा, असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात येत होता. आज विनंती करतो आहे, वेळीच ऐकून घ्या; अन्यथा मोठ्या कारवाईशिवाय माझ्याकडे पर्याय नसेल, अशा शब्दांमध्ये पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला.

ठाणे शहरामध्ये फेरीवाल्यांसाठी नियम ठरवण्यात आले आहेत. फेरीवाला प्रतिबंधक क्षेत्र ठरवण्यात आले आहे. तेथे फेरीवाले दिसत असतील तर आम्ही त्यांच्यावर कारवाई सुरूच ठेवू. शहरातील रुंद रस्ते हे नागरिकांसाठी आहेत. ते फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी अडवल्यास त्यांच्यावर सतत कारवाई करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फेरीवाल्यांना विरोध नाही
आजच्या कारवाईदरम्यान मी स्वत: गोखले रोड, राममारुती रोड, स्थानक परिसर फिरलो. त्या वेळी अत्यंत शिस्तीचे वातावरण दिसून आले. रिक्षाचालक शिस्तीचे पालन करत असल्याचे आज मला दिसून आले. वर्तकनगर, वसंतविहार या भागांतील रस्ते फेरीवाल्यांमुळे बंद असतात, अशी तक्रार होती. त्यामुळे आज कारवाई केली आहे.

फेरीवाल्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवावा. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. रस्त्यापासून दूर एका बाजूला दुकान लावल्यास त्याला माझा विरोध नाही; परंतु पूर्ण रस्ते बंद करणे, पूर्ण फुटपाथ बंद करणे, अशांवर कारवाई सुरूच राहील. मी शंभराहून अधिक नागरिकांशी बोललो असून, त्यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. कारवाईदरम्यान विरोध केला जात आहे. समोरून आमच्यावर हात उगारला तर आम्ही एक तर एफआयआर करत बसू शकतो किंवा आमचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
- संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त

जप्त फळ आणि खाद्यपदार्थ गरजूंना...
ठाणे महापालिकेच्या कारवाईदरम्यान जप्त केलेली फळे, भाजीपाला आणि अन्य खाद्यपदार्थ ठाण्यातील गरजूंना देण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. कळवा रुग्णालय, सिव्हील रुग्णालय, आश्रमशाळा, अनाथाश्रम या ठिकाणी हे साहित्य पाठवण्यात येणार आहे. ज्यामुळे या वस्तूंचे नुकसान होणार नसून गरजूंपर्यंत त्याचा वापर होऊ शकेल, असेही आयुक्तांनी या वेळी सांगितले.

घोडबंदर परिसरात कारवाईचा तडाखा कायम...
ठाणे महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या कारवाईचा तडाखा शनिवारीही कायम होता. केवळ स्थानक परिसरापुरते मर्यादित न राहता शनिवारी घोडबंदर परिसरात दोन ते तीन पथकांनी मिळून रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या. हॉटेल, दुकानदारांनी रस्त्यासमोर पसरलेल्या वस्तू महापालिकेने जप्त केल्या, तर साहित्य जेसीबीच्या साह्याने भुईसपाट केले. घाणेकर नाट्यगृह, लोकपुरम, टिकुजिनीवाडी रोड, विद्यापीठ, मानपाडा आदी भागात कारवाई सुरू होती. अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, संजय हेरवाडे यांची पथके या भागामध्ये कारवाई करत होती.

Web Title: Keep the road clearance request!