रखवालदारानेच मारला सोन्यावर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

तीन आरोपींना सिमला येथून अटक 

अंधेरी : चारकोप येथील एका रहिवाशाने कुटुंबासह गोव्याच्या सहलीवर जाताना इमारतीच्या रखवालदाराला घरावर लक्ष ठेवण्याची विनंती केली. परंतु, या रखवालदारानेच त्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी आरोपी रखवालदारासह तिघांना अटक करून 21 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

हे कुटुंब 5 नोव्हेंबरला सकाळी गोवा पर्यटनासाठी रवाना झाले. जाताना त्यांनी इमारतीचा सुरक्षा रक्षक जीवन मानसिंग बुढा (39, मूळ रा. नेपाळ) याला घरावर लक्ष ठेवण्याची विनंती केली. परंतु, या रखवालदाराने त्यांचा विश्‍वासघात केला. गोव्यात मौजमजा करून 12 नोव्हेंबरला पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास परत आलेल्या या कुटुंबाला घराचा कडीकोयंडा उचकटल्याचे आणि कपाटांची कुलुपे तोडून सोन्याचे दागिने पळवून नेल्याचे आढळले.

त्यांनी सुरक्षा रक्षक जीवन बुढा याचा शोध घेतला असता, तो पत्नीला सोडण्यासाठी नेपाळला गेल्याचे समजले. त्यावरून संशय बळावल्यामुळे त्यांनी तातडीने चारकोप पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील नौपाल भागातून जीवन बुढा, मुकेश मानसीब बुढा (32, रा. नेपाळ) व संतोष बीरे बुढा (32 रा. नेपाळ) यांना अटक केली. चोरीला गेलेल्या ऐवजातील 21 तोळ्यांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी शिमला येथून हस्तगत केले आहेत. 

शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 
पोलिसांनी अटक केलेले तिघेही सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. न्यायालयाने त्यांना 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The keeper struck and struck gold