यंत्रसामग्री न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

File Photo
File Photo

मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात लागलेल्या आगीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित यंत्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी गुरुवारी अपघातग्रस्त बाळाच्या पालकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. याप्रकरणी त्यावेळी उपस्थित रुग्णांचे नातेवाईक व इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

याप्रकरणी अग्निशमन दल, बेस्ट व इतर यंत्रणांशीही पोलिसांनी पत्रव्यवहार केला असून आगीबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. केईएम रुग्णालय अपघातप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला होता.

केईएम रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. त्यात प्रिन्स राजभर हे दोन महिन्यांचे बाळ १५ ते २० टक्के भाजले. प्रिन्सचा डावा हात पूर्णपणे भाजल्याने काढावा लागला. ही शस्त्रक्रिया सोमवारी पार पडली. वाराणसीच्या स्थानिक रुग्णालयात प्रिन्सच्या हृदयविकाराचे निदान झाले होते.

उपचार, शस्त्रक्रियेसाठी तेथील डॉक्‍टरांनी प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली. त्यानुसार सोमवारी वडील पन्नेलाल राजभर यांनी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर हा गंभीर प्रकार घडला. सोमवारी प्रिन्सचा हात काढल्यानंतर मात्र वडील पन्नेलाल यांनी पोलिस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
 

पालिकेची अडचण
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेने विशेष समिती गठीत केली होती. ही समिती इसीजी मशीनची तपासणी करणार होती. मात्र, ही मशीन तसेच इतर उपकरणेही पोलिसांनी न्याय वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतल्याने पालिकेची अडचण झाली आहे. मात्र, विस्तृत वैद्यकीय विश्‍लेषण तसेच प्रत्यक्ष पाहणी करून ही 
समिती अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.

रुग्णालयातील उपकरणांची तपासणी होणार
दरम्यान, केईएम रुग्णालयातील या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सर्व उपकरणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात काही बिघाड असल्यास दुरुस्त करून त्याचे व्यवस्थापन का होत नाही, याबाबत संबंधितांना जाब विचारण्यात येणार असल्याचे समजते. प्रिन्स जोपर्यंत वैद्यकीयदृष्ट्या स्थिर होत नाही तोपर्यंत आवश्‍यक वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

त्यानंतर हृदयशस्त्रक्रिया तसेच प्लास्टिक सर्जरीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच त्याचे वैद्यकीय उपचार रुग्णालयामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. हेमंत देशमुख यांनी गुरुवारी प्रिन्सचे वडील पन्नेलाल यांना तुटलेल्या हाताची प्लास्टिक सर्जरी तसेच हृदयविकाराबाबत माहिती दिली. तसेच त्याच्यावर सुरू असलेल्या उपाचारांबाबत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com