केईएम रुग्णालयातील समुपदेशन केंद्र दोन वर्षांपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

परळमधील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेने सुरू केलेले रुग्ण समुपदेशन केंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ते बंद करावे लागल्याचे समजते.

मुंबई - परळमधील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेने सुरू केलेले रुग्ण समुपदेशन केंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ते बंद करावे लागल्याचे समजते.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात पहिल्या मजल्यावर जानेवारी २०१६ मध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले. केंद्रातील मनुष्यबळाच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी नसल्यामुळे राज्य फार्मसी परिषद स्वतःकडील निधी वापरून अधिकाऱ्यांना वेतन देत होती. रुग्णांना औषधांबाबत योग्य माहिती देणे, उच्च रक्तदाब किंवा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणे, अशी कामे केंद्रात होत असत.

केंद्र सुरू झाल्यावर दिवसाला १०० हून अधिक रुग्णांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जात असे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागावरील भार अंशत: कमी होण्यास मदत झाली होती, परंतु वर्षभरातच तीन कर्मचारी समुपदेशन केंद्र सोडून गेले. बी. फार्म. आणि एम. फार्म. केलेल्या उमेदवारांची जास्त वेतनाची अपेक्षा असल्याने नव्या नियुक्‍त्यांमध्ये अडचणी येत आहेत. 

कर्मचारी मिळाल्यास केंद्र सुरू
योग्य कर्मचारी मिळाल्यास केंद्र पुन्हा सुरू होईल, असे परिषदेकडून सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या अन्य दोन रुग्णांलयात समुपदेशन केंद्रे सुरू करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KEM hospital counseling center has been closed for two years

टॅग्स