मुंबईतील "फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक 

मुंबईतील "फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक 

मुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून "साथी हात बढाना'ची साद घातली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या फूड आर्मीने रविवार व सोमवार या दोन दिवसांत 30 ते 40 टन खाद्यपदार्थ मिळण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र, मदतीचा तुफान पाऊसच पडल्याने ते रविवारी दुपारपर्यंतच जमा झाले! 

त्यामुळे मुंबईतील ही मदत केंद्रे रविवारीच बंद करून ही "फूड आर्मी' अन्नधान्य व खाद्यपदार्थ व्यवस्थित पॅक करण्याच्या मोहिमेत गढून गेली. अतिवृष्टीशी लढत असलेल्या केरळवासीयांसाठी ही रसद आता मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी बेंगळूरुमार्गे केरळला रवाना होईल. 

एकटा माणूस काहीही करू शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र, सांताक्रूझच्या रिंटू यांचा हा स्वभावच नाही. रामाच्या सेतूबंधनाला मदत करणाऱ्या खारीचे स्पिरीट त्यांच्यात आहे. 2014 मध्ये काश्‍मीरच्या आपद्‌ग्रस्तांसाठी मदत करायची, असे एकटीनेच ठरवून त्यांनी मित्रांपासून सुरुवात केली होती. काश्‍मीरमधील त्या वेळच्या पुरात सेनादलातर्फे कोरडा खाऊ वाटण्यात येत होता. त्यापेक्षा या पूरग्रस्तांना घरचे अन्न द्यावे, ही कल्पना राठोड यांनी आपले मित्र, परिचित, नातलग आदी 200 जणांसमोर मांडली होती. आपण प्रत्येकी 25 ठेपले करूयात; म्हणजे चार-पाच हजार सहज ठेपले मिळतील, असा विचार त्यांनी मांडला. लोकांकडून त्यांना 35 हजार ठेपले मिळाले! त्यांची ही धडपड पाहून जेट एअरवेजने हे साहित्य काश्‍मीरला पाठवले आणि तेथील त्यांच्या मित्रांनी त्याचे वाटप केले होते. त्यानंतर 2015 च्या नेपाळ भूकंपातही त्यांनी एक लाख ठेपले हवाबंद पाकिटातून पाठवले. त्यानंतर 2016 च्या चेन्नईमधील पुरात आणि त्यानंतर 2017 मध्ये गुजरातच्या बनातकाठा येथील आपद्‌ग्रस्तांसाठीही त्यांनी अशीच मदत केली होती. 

आता जमा झालेला हा साठाही जेट एअरवेजमार्फत बेंगळूरुला जाईल आणि तेथील यूथ फॉर सेवा या संघटनेमार्फत म्हैसूर व केरळमधील वायनाड येथे पाठवला जाईल. राठोड यांच्या या फूड आर्मी संघटनेत कोणतेही सदस्यत्व शुल्क नाही वा ते कसलीही देणगी घेत नाहीत. 

रेडी टू ईट! 
केरळमधील नागरिकांना ठेपले आवडणार नाहीत, हे जाणून रिंटू यांनी रेडी टू इट कोरडा सांजा (पाण्याशिवाय सर्व मसाले घालून तयार केलेला, तेथे फक्त गरम पाणी टाकून तो खायचा), तूरडाळ, तांदूळ, साखर, दूधभुकटी असा शिधा लोकांकडून मागवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com