केरळमधील महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पतीची हत्या करून प्रियकरासोबत केरळ येथून मुंबईत आलेल्या व त्यानंतर अटकेच्या भीतीने पनवेलमधील समीर लॉजमध्ये दोन वर्षीय मुलीला विष पाजून प्रियकरासह स्वत: विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लिजी कुरियन या महिलेला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली.

नवी मुंबई : पतीची हत्या करून प्रियकरासोबत केरळ येथून मुंबईत आलेल्या व त्यानंतर अटकेच्या भीतीने पनवेलमधील समीर लॉजमध्ये दोन वर्षीय मुलीला विष पाजून प्रियकरासह स्वत: विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लिजी कुरियन या महिलेला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. विष प्राशन केल्यामुळे गेल्या महिनाभरापासून लिजीवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. 

केरळ येथील लिजी कुरियन पतीची हत्या करून प्रियकर वसीम याच्यासह मागील महिन्यात मुंबईत आली होती. मात्र, अटक होईल या भीतीने पनवेलच्या समीर लॉजिंग ऍण्ड बोर्डिंगमध्ये प्रियकरासह विष पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या वेळी लिजीने आपल्या दोन वर्षीय मुलीलादेखील विष पाजल्याने तिचा यात मृत्यू झाला. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी लिजी आणि तिचा प्रियकर या दोघांवर मुलीची हत्या करणे व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला. विष प्राशन केल्यामुळे लिजी आणि तिचा प्रियकर हे दोघे अत्यवस्थ असल्याने पोलिसांनी या दोघांना मुंबईतील जे. जे. रुगणालयात दाखल केले होते. गेल्या महिनाभरापासून उपचार घेत असलेल्या लिजीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तेथील डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी मागील आठवड्यात तिला अटक केली. न्यायालयाने लिजीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याने, तिची कल्याण येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रियकर वसीम याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याबाबत अद्याप अहवाल दिला नसल्याने, त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala woman arrested for her husband's murder