सातपाटी मच्छीमार बंदरात केरळची बोट! 

File Photo
File Photo

पालघर : पालघर परिसरातील सातपाटीनजीक एक केरळची बेवारस बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बोटीतून दुर्गंधी येत असल्याने प्रत्यक्षदर्शी मच्छीमारांनी त्याबाबत डहाणू कोस्ट गार्डला माहिती दिली आहे. दरम्यान, महा वादळाच्या तडाख्यात सापडून ही बोट भरकटून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विनोद पाटील यांना शनिवारी (ता. 16) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या संस्थेच्या काही बोटींवरील मच्छीमारांनी वायरलेस सेटवरून पोझिशन क्रमांक 19:46.630 व 71.58.530 या जागेवर एक लोखंडी बोट उभी असल्याची माहिती दिली.

या बोटीच्या क्रमांकावरून (IND.KA.02.MM76) ही बोट केरळ राज्यातील असल्याचे सांगून बोटीजवळ जाऊन अनेक वेळा हाका मारूनही कोणी प्रत्युत्तर देत नसल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. त्या बोटीतून कुजलेल्या वस्तूची दुर्गंधी येत असल्याने बोटीत जाण्याचे कोणीही धाडस करीत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

बोटीचे मालक मुंबईत! 
मच्छीमार हे देशाच्या सुरक्षा यंत्रणेचे समुद्रातील "डोळे' असल्याचे म्हणणे सार्थ ठरवत मच्छीमारांनी या संशयास्पद बोटीची तत्काळ माहिती पोलिस यंत्रणा, तहसीलदार यांना कळवली. याबाबतची माहिती डहाणू येथील कोस्ट गार्डला कळवण्यात आल्यानंतर त्यांनी या बोटीच्या मालकाचा शोध घेतला असून ते आपल्या बोटीच्या शोधासाठी मुंबईत दाखल झाले असल्याचे सांगितले.

थेट केरळमधून माशांच्या थव्यांचा शोध घेत या मोठमोठ्या बोटी आता इथल्या स्थानिक परंपरागत मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या क्षेत्रात आल्याने मच्छीमारांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे.

महावादळाच्या तडाख्यात सापडून ही बोट भरकटून आली आहे. याबाबतची माहिती डहाणू कोस्ट गार्डला कळवली असून बोटीतून येणारी दुर्गंधी माशांची आहे, की मानवी मृतदेहाची आहे, याबाबत कोस्ट गार्ड तपास करीत आहेत. 
- जितेंद्र ठाकूर,
सहायक पोलिस निरीक्षक, सातपाटी सागरी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com