Water Issue : कालव्याचे पाणी बंद; खालापुरात टंचाईच्या झळा तीव्र khalapur kalote dam canal water close water shortage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Issue

Water Issue : कालव्याचे पाणी बंद; खालापुरात टंचाईच्या झळा तीव्र

खालापूर - पाटबंधारे विभागाने कलोते धरणातून कालव्याला पाणी सोडण्यास नकार दिल्याने खालापूर शहरात दुष्काळसदृशस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत तहसीलदार आयुब तांबोळी यांनी तातडीने पाटबंधारे विभाग अधिकारी आणि खालापूर नगरपंचायत यांची बैठक बोलावली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी खालापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील दहा व्यावसायिक जोडण्या नगरपंचायतीकडून तोडल्‍या होत्‍या. त्यामुळे खालापूर शहराचा पाणीसमस्‍या कमी होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती.

विहीर पुन्हा कोरडी

१) कलोते धरणातून कालव्याला पाणी सोडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या विहिरीला पाझर फुटला होता. विहिरीत जमा झालेले पाणी पंपाद्वारे खालापूर येथील जलकुंभात शुद्धीकरण करून चढवण्यात येत होते. परंतु कालव्याचे पाणी बंद झाल्‍याने विहीर आटल्‍याने दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी आणीबाणी निर्माण झाली आहे.

२) कालव्याला पाणी सोडल्यास अधिकाधिक पाणी वाया जात असल्याने ते बंद केल्‍याचे बोलले जात आहे. हजारो लिटर उपसा करणाऱ्या व्यावसायिकांचा पाणीपुरवठा बंद होताच दुसऱ्या दिवशी खालापूर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्‍याने शहरात चर्चा रंगल्‍या आहेत.

खालापूर शहरातील पाणीटंचाई कमी करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि खालापूर नगरपंचायतीतील अधिकाऱ्यांबरोबरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल.

- आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

कलोते धरणातून इमॅजिकासाठी दररोज लाखो लिटर पाणी पुरवठा होतो. खालापूर शहराची पाणीटंचाई वर तोडगा म्हणून तात्पुरत्‍या स्वरूपात इमॅजिकासाठी दिलेल्‍या जलवाहिनीवर जोडणी द्यावी

- शिवानी जंगम, नगरसेविका

धरणातून कालव्याला पाणी सोडावे यासाठी आग्रही आहोत. पाणी वाया जाऊ नये यासाठी विहिरीजवळ बांध घालून अधिकाधिक पाणी विहिरीत जाईल, असे प्रयत्न सुरू आहेत.

तहसील कार्यालयात बैठकीनंतर यावर तोडगा निघेल.

- देवेंद्र मोरखंडीकर, नगर अभियंता, खालापूर नगरपंचायत

३० जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा कलोते धरणात शिल्लक आहे. कालव्याला पाणी सोडल्यास जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत पाणी पोहचेपर्यंत अधिकाधिक पाणी वाया जाते. त्यासाठी थेट कलोते धरणात जलवाहिनी टाकून पाणी उचलावे, असे खालापूर नगरपंचायतीला कळवले आहे.

- भरत गुंटूंरकर, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग, कर्जत

हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

पेण - तालुक्यातील अंतोरे, नवघर, पाटणोली, वरेडी, हमरापूर व जिते विभागातील संबंधित गावांना २० ते २५ दिवसांपासून सिडकोच्या मुख्य जलवाहिनीतून माती मिश्रित गढूळ, दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्‍यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत संबंधितांनी तत्‍काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग व पाणीपुरवठा विभाग कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पेणच्या हेटवणे धरणातून होणारा पाणीपुरवठा सिडकोच्या जलवाहिनीतून संबंधित गावांना होत आहे, मात्र गेल्‍या काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्‍त पाणी येत असल्‍याने पोटदुखी, उलटी, मळमळ अशा आजाराने नागरिक त्रस्‍त आहेत.

हेटवणे धरणात पाणी साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, तरीही गढूळ पाणी येत असल्‍याने नागरिक पिण्यासाठी विकत किंवा अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.