बेपत्ता तरुण 40 वर्षांनी सापडला

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - कौटुंबिक वादातून नैराश्‍य आल्याने वयाच्या 25 व्या वर्षी घरातून पळालेली मणिपूरमधील व्यक्ती तब्बल 40 वर्षांनंतर मुंबईत सापडली. खोमद्राम सिंग असे त्याचे नाव असून, तो वांद्रे परिसरात मोलमजुरीसह भिक्षा मागत होता. मणिपूरच्या पातसोई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर वांद्रे पोलिसांनी या ज्येष्ठ नागरिकाला ताब्यात घेतले. खोमद्रामची बुधवारी कुटुंबीयांबरोबर भेट होणार आहे.

खोमद्राम हा इम्फाळच्या डोंगरकुशीत वसलेल्या एका गावातील रहिवासी. वयाच्या 25 व्या वर्षी त्याचा विवाह झाला. त्यानंतरच्या अवघ्या चार महिन्यांनी (1976) कौटुंबिक वादातून खोमद्रामने घरातून पळ काढला. नातेवाइकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर इम्फाळ पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली. इम्फाळ पोलिसांनीही त्याचा शोध घेतला होता. अखेर नातेवाइकांनी त्याची पुन्हा भेट होईल, ही आशाच सोडली होती.

दरम्यान, गेल्या वर्षी मणिपूरमधील एका तरुणीला खोमद्राम हे वांद्रे परिसरात भिक्षा मागताना दिसले. तिने त्यांची आपुलकीने विचारपूस केली. खोमद्राम हे नेपाळचे रहिवासी असावेत, असा सुरवातीला तिचा अंदाज होता. अखेर भावूक झालेल्या खोमद्रामने आपण मणिपूरचे रहिवासी असल्याचे सांगितले.

खोमद्राम यांनी 1993 मध्ये मुंबईत आल्यावर काही हॉटेलमध्ये काम केले. उतारवयामुळे हॉटेलची नोकरी सुटली. भूक भागवण्यासाठी अखेर त्यांनी भिक्षेचा पर्याय निवडला. रस्त्यावर राहून दिवस काढल्याचे त्यांनी तरुणीला सांगितले. त्या तरुणीने खोमद्रामची छायाचित्रे काढून ती मणिपूर पोलिसांना पाठवली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. त्यांना ताब्यात घेण्याकरिता मणिपूर पोलिस आज मुंबईत आले आहेत. ते खोमद्राम यांना घेऊन बुधवारी मणिपूरला पोचणार आहेत.

खोमद्राम हे 40 वर्षांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. एका तरुणीने त्यांची छायाचित्रे पाठवली होती. त्याआधारे तपास करण्यात आला. खोमद्राम सापडल्याची माहिती त्यांच्या भावाला कळवण्यात आली आहे. 40 वर्षांनंतर त्यांची भावासोबत भेट होणार आहे.
- बिशोलुवा लुवांग, पोलिस उपनिरीक्षक, पातसोई

Web Title: khomdram singh receiver after 40 years