हत्या करुन प्रेयसीला कचऱ्यात जाळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ऐन दिवाळी सणात कल्याणमधील बल्याणी टेकडीवर कचऱ्याच्या ढिगात अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

ठाणे : ऐन दिवाळी सणात कल्याणमधील बल्याणी टेकडीवर कचऱ्याच्या ढिगात अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तरुणीचा प्रियकर नीरज मौर्या (20) याला पोलिसांनी अटक केली.

मृत मोहिनी गुप्ता (19) आणि नीरज हे दोघे गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नीरजचे आई-वडील घरात घेत नसल्याने प्रेमी युगुलांमध्ये वारंवार भांडण होत असे. त्यातूनच त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. या दोघांची ओळखही फेसबुकच्या माध्यमातून झाल्यानंतर ती उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आली होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली. 

बल्याणी टेकडीवर रस्त्याच्या कडेला बिपिन सिंग यांच्या दुकानासमोर कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका अनोळखी 25 ते 30 वयोगटातील महिलेचा मृतदेह जळत असल्याची माहिती मिळाली होती. हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रॉकेल टाकून पेटवून दिल्याने मृतदेह अर्धवट जळल्याच्या स्थितीत आढळला होता. याप्रकरणी अकील शहा (31) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीसह महिलेच्या वारसांचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले.

त्यानुसार, शोधमोहिमेला सुरुवात झाली. याचदरम्यान, बल्याणी येथील दुबे कॉलेजजवळील नीरज हा दीड वर्षापासून त्याची मैत्रीण मोहिनी गुप्ता हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ती त्याच्यासमवेत दिसून येत नसल्याने पोलिसांनी नीरजला ताब्यात घेतले. चौकशीत नीरजने हत्येची कबुली दिली. 

web title : Killed and burned the beloved in the trash


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killed and burned the beloved in the trash