पुराच्या तडाख्यानंतरही खंड्याची फिनिक्‍स भरारी 

पुराच्या तडाख्यानंतरही खंड्याची फिनिक्‍स भरारी 

पनवेल : धुवाधार पाऊस. सर्वत्र पूरपरिस्थिती. माणसांचे राहण्याचे आणि खाण्याचे हाल. तिथे मुक्‍या जीवांचे काय? निसर्गाच्या या कोपाचा फटका कर्नाळा पक्षी अभयारण्यातील तिबोटी खंड्यालाही बसला. त्यांची पिल्ले दगावली. घरटी मोडली; पण या मुक्‍या जीवाने हार मानली नाही. एक दिवस शोक व्यक्त करून दुसऱ्या दिवसांपासून जोमाने कामाला लागून पुन्हा घरटी बांधली. पिल्लांनाही पुन्हा जन्म दिला. त्यांची ही जिद्द पाहिल्यानंतर पक्षी निरीक्षक आणि वन कर्मचारीही अचंबित झाले. 

तिबोटी खंड्यासाठी कर्नाळा पक्षी अभयारण्य नंदनवन आहे. मे महिन्याच्या अखेरीस त्याचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांनी तेव्हापासून घरटी बांधण्यास सुरुवात केली. दोन आठवड्यांनंतर ती पूर्ण झाली. त्यानंतर त्यांनी अंडी घातली. जुलैपासून मुसळधार पाऊस पडू लागला. ऑगस्टमध्ये तर अतिवृष्टी झाली. निसर्गाच्या या आघातात खंड्याची घरटी वाहून गेली. तेव्हा तीन दिवस पिल्ले जिवंत होती; पण अल्पावधीतच होत्याचे नव्हते झाले. पिल्ले वाहून गेली. या घटनेचा खंड्याने धसका घेतला; पण एक दिवस शोक व्यक्त करून दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्याने नवीन घरटे तयार करण्यास सुरवात केली. अवघ्या चार दिवसांत ते पूर्ण करून प्रजनन प्रक्रिया सुरू केली. पिल्लांना जन्मही दिला, अशी नोंद पक्षी निरीक्षक आणि वन कर्मचाऱ्यांनी केली आहे. या पक्ष्याची जिद्द पाहून ते अचंबित झाले. 

विणीच्या हंगामात पर्यटकांना बंदी 
कर्नाळा पक्षी अभयारण्यात येणारे पर्यटक पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी गोंधळ घालतात, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांबरोबर चर्चा करून विणीच्या हंगामात छायाचित्रे काढण्यास आणि अधिवास परिसरात जाण्यास बंदी घातली होती. या कालावधीत वनरक्षक युवराज मराठे यांनी वनमजूर सुनील भगत, अरुण वेहळे आणि मुंबईतील पक्षी अभ्यासक ओमकार खरात यांनी खंड्याच्या घरट्यांचे निरीक्षण आणि संरक्षण केले. 

असा आहे तिबोटी खंड्या 
भारतात आढळणाऱ्या खंड्याच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान आहे. या पक्ष्याचा समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होतो. तो दक्षिण भारतातून प्रजननासाठी मुंबई आणि परिसरातील क्षेत्रात येतो. त्यानंतर सप्टेंबर- ऑक्‍टोबरदरम्यान पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. त्याचा विणीचा हंगाम अत्यंत नाजूक समजला जातो. नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस पाणी पातळीचा अंदाज घेऊन मातीमध्ये हे पक्षी बिळ तयार करून त्यामध्ये घरटे तयार करतात. महत्त्वाचे म्हणजे आपत्ती काळात पर्याय म्हणून जवळच दुसरे घरटेही हे पक्षी तयार करतात. 

निरीक्षणासाठी नोकरीवर पाणी 
मुंबईतील ओमकार खरात हा तरुण कर्नाळा परिसरात तिबोटी खंड्यावर अभ्यास करत आहे. तो त्याचा अधिवास वाचवण्याच्या कामात वनकर्मचाऱ्यांना मदत करतो. तो मागील चार महिन्यांपासून याच ठिकाणी ठाण मांडून आहे. त्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे. 

तिबोटी खंड्याने घरटे बांधल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच मादी अंडी देते. 17 ते 18 दिवस नर व मादी आळीपाळीने ती उबवण्याचे काम करतात. पिल्लांना घरट्यातच अन्न भरवतात. 20 दिवसांनी पिल्ले घरट्याच्या बाहेर पडतात. पुढील 2 ते 3 दिवस हवेत उडायला आणि शिकार करायला शिकवल्यावर चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते पुन्हा जुन्या ठिकाणाकडे वळतात. 
- ओमकार खरात, तिबोटी खंड्या अभ्यासक 

तिबोटी खंड्याला घरटे बांधण्यासाठी दोन आठवडे लागतात; परंतु मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर त्यांची घरटी नष्ट झाली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत नवीन घरटी बांधली. हे आचंबित करणारे आहे. 
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com