'कोकण भवन'समोर मराठ्यांचा भगवा सागर!

'कोकण भवन'समोर मराठ्यांचा भगवा सागर!

खारघर-सीबीडी बेलापूर झाले भगवे; मूक मोर्चा ठरला चर्चेचा विषय
नवी मुंबई - आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा आणि कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी, या मागण्यांसाठी बुधवारी रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाजाने काढलेला मूक मोर्चाही लक्षवेधी ठरला. पावसाची रिपरिप सुरू असतानाही धीरोदात्तपणे प्रत्येक मोर्चेकरी शिस्तबद्धपणे चालत होता. प्रत्येक पाऊल निर्धाराने टाकणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना पाहून नागरिकांची पावलेही थबकली. प्रत्येकाच्या तोंडी हा मूक मोर्चा म्हणजे कौतुकाचा विषय झाला. विभागीय कोकण आयुक्तांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले.

सकाळपासून नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्कसमोर हजारो आबालवृद्ध जमत होते. कुठेही, कसलीही गडबड-गोंधळ नाही. प्रत्येकाच्या मनातला निर्धार पक्का होता. रायगडमधील खेड्यापाड्यातून मिळेल त्या वाहनाने मुले, महिलाही हजारोंच्या संख्येने या मोर्चासाठी आल्या होत्या. "एक मराठा, लाख मराठा‘चा दणका देण्याचा निश्‍चय या सर्वसामान्यांनी मनोमन केला होता. नवी मुंबईत एकवटलेला हा संयमी महासागर पाहून सगळे जण चकित झाले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही हा अनुभव नवीन होता.

मोर्चाच्या अग्रभागी मुले व महिला चालत होत्या. पावसाची रिपरिपही त्यांच्या मनोधैर्याचा भंग करू शकली नाही. त्यांच्या मागोमाग वयोवृद्ध पुरुष व सोबत तरुणांचा ताफा चालत होता. मराठा अस्मितेचा भगवा झेंडा मिरवत, हातातील फलक उंचावत एकमेकांमागून त्यांची पावले पडत होती. त्यांचे ओठ बंद असले तरी आजवर सहन केलेल्या अत्याचाराला वाचा फोडणारे होते. "मिनी मंत्रालय‘ मानल्या गेलेल्या बेलापूरमधील "कोकण भवन‘च्या दिशेने हजारो पावले पडत होती. मोर्चाच्या भोवतीने स्वयंसेवकांनी मानवी साखळी केली होती. सीबीडी-बेलापूरमधील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) सर्कलजवळ मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले. येथे कुणीही नेता नव्हता. ही सभा वेगळीच होती. ही सभा सुरू होण्यापूर्वी कोपर्डी प्रकरणातील मृत मुलीला सर्व मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

या सभेत दोन तरुणींनी मराठा समाजाची व्यथा नेमक्‍या शब्दांत मोठ्या बाणेदारपणे मांडली. एका तरुणीने मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी लिहिलेले निवेदन खणखणीतपणे वाचून दाखवले. दुसऱ्या मुलीने दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ऍट्रॉसिटी) आडून कशा प्रकारे खोट्या तक्रारी केल्या जात आहेत, याचे विदारक चित्र मांडले. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजावर कसा अन्याय होत आहे, हेसुद्धा तिने सांगितले. अर्थातच, या सगळ्यांच्या मनातल्या भावना होत्या.
 

विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शांतपणे मोर्चेकरी निघून गेले.

डॉक्‍टरही समाजासाठी मोर्चात
एखाद्या समाजाचा मोर्चा म्हटला की, सर्वसामान्यांचीच गर्दी, असे चित्र असते. पण मराठा समाजाच्या या मोर्चात उच्च शिक्षितही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे गणवेशात आणि स्टेथास्कोप सोबत घेऊनच आले होते.

मोर्चात सहभागी झालेल्या एखाद्या व्यक्तीवर ऐनवेळी उपचाराची आवश्‍यकता निर्माण झाल्यास तातडीने ती सेवा देण्याची तयारी होती, असे डॉ. आर. एन. पाटील, डॉ. प्रशांत थोरात यांनी सांगितले. समाजाला गरज असून आम्ही त्यांच्या मदतीसाठी कधीही तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खबरदार वाईट नजरेने बघाल तर...
कोपर्डी प्रकरणामुळे संताप आहे. आमच्या मुली शांत बसणार नाहीत, असा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या मिताली घरत या दहावीच्या विद्यार्थिनीने दिला. बहिणींना न्याय देण्यासाठी मोर्चात सहभागी झाल्याचे तिने सांगितले. ही लाट कधी ना कधी उसळणारच होती, ती आता उसळली, असे तिने सांगितले. तसेच गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; अन्यथा इतरही शेफारतील, अशी भीती तिने व्यक्त केली.

अनुजाचा आक्रोश अन्‌ टाळ्यांचा कडकडाट
मोर्चा बेलापूरला थांबल्यावर निवेदनाचे वाचन झाले. या वेळी सीवूड्‌समधील अनुजा पाटीलने तीव्र भाषेत तिची खदखद व्यक्त केली. तिच्या आक्रोशाने उपस्थितांची मनेही काही काळ हेलावली. प्रत्येक वाक्‍याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. अनुजानेही जाता जाता "नका ठेवू वाईट नजर जिजाऊंच्या लेकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर‘ असा सज्जड दमही दिला.

शाळांना सुटी; काही अर्ध्यातून सोडल्या
खारघरमधून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाल्याने काही शाळांनी चाचणी किंवा अन्य परीक्षा असतानाही शाळा सोडल्या. काही शाळांनी आधीच सुटी दिली होती.

पोलिसांची हातावर घडी
नेतृत्वविरहित असूनही मराठा क्रांती मोर्चा अतिशय शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण निघाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला नाही. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस काठी घेऊन मोर्चाकडे पाहत उभे होते. त्यांना कोणत्याही सूचना अथवा मोर्चात हस्तक्षेप करावा लागला नाही.

नेतेमंडळी मागेच
नेहमी मोर्चांचे नेतृत्व करणारे विविध पक्षांचे नेते या वेळी मात्र मोर्चाच्या अगदी शेवटच्या टोकाला होते. आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, भरत गोगावले, प्रवीण दरेकर यांच्यासह नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते मोर्चाच्या मागे होते.

बघ्यांची धावपळ तर सेल्फी प्रेम
मोबाईल कॅमेऱ्यामध्ये मोर्चाचे दृश्‍य कैद करण्यासाठी रस्ते व उंच ठिकाणावरून बघ्यांची सैरावैरा धावपळ सुरू होती. खारघरमधून सुरू झालेला मोर्चा प्रत्येक जण मोबाईल फोनच्या कैद करण्यासाठी धावपळ करताना दिसत होता. भव्यदिव्य मोर्चा पाहिल्यानंतर काही सेल्फीप्रेमींना मोह आवरता आला नव्हता. त्यामुळे मोर्चा ठराविक अंतरावर आल्यानंतर घोळक्‍यातून सेल्फी कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत होते.

स्वच्छतेचे भान
मोर्चा विर्सजित झाल्यानंतर खाऊची पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यात किंवा मोर्चाच्या ठिकाणी टाकून जातात. हा अनुभव वर्षानुवर्षे आहे; परंतु हा कचरा उचलण्याच्या जबाबदारी स्वयंसेवकांवर होती. त्यांनी ती तितक्‍याच जाणिवेने पूर्ण केली. त्यामुळे परिसर स्वच्छ राहिला.

नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर अशोक गावडे, नवी मुंबई महिला अध्यक्षा माधुरी सुतार यांनी मोर्चेकऱ्यांना स्वतः मोर्चेकऱ्यांना पाण्याचे ग्लास दिले. खारघरचा राजा सार्वजनिक मंडळाकडून पाण्यासाठी एक टॅंकरची व्यवस्था केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com