ठाणे : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने दिली बंदची हाक

The Konkan division of Rickshaw taxi federation agitate at thane
The Konkan division of Rickshaw taxi federation agitate at thane

ठाणे : आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने संपूर्ण कोकण विभागात 18 जूनला बंदची हाक दिली आहे. बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे शस्त्र पहिल्यापासूनच रिक्षा संघटना अवलंबित आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा चालकांच्या समस्या, मागण्यांविषयी कायम बंदची हाक देणाऱ्या संघटनांनी प्रत्यक्षात कधी ग्राहकांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतले आहे का? हा एक प्रश्न अनुत्तरीतच आहे.

दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढत आहे, ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देणे, अवास्तव भाडे वाढविणे, रात्रीच्यावेळेस असुरक्षित प्रवास आदि अनेक समस्या ग्राहकांच्या असून याचा विचार संघटना कधी करणार आहेत असा सवाल आज प्रत्येक नागरिक करु लागला आहे. प्रत्येक रिक्षाचालक संघटनेशी निगडीत नाही, असे बोलून संघटना आज आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. विभागाचे संघटनच जर रिक्षाचालकांची जबाबदारी घेत नाही तर त्यांच्या मागण्यांसाठी प्रवाशांना वेठीस धरण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे मत प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

राज्य शासनाने मुक्त केलेले ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांना तातडीने स्थगिती द्यावी, रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करावी, ऑटोरिक्षा कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी कोकण विभाग टॅक्सी महासंघाने येत्या 18 जूनला बंदची हाक दिली आहे.

या बंदमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सर्वपक्षीय रिक्षा टॅक्सी युनियन सहभागी होत आहेत. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मागण्या मंजुर करण्यासाठी बंद पुकारुन कायमच प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. महासंघाच्या मागण्या सरकार मान्य करेल की नाही हा वेगळा मुद्दा परंतू याबंदमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, प्रवाशी यांचे आतोनात हाल होतात.





गेली पाच वर्षे रिक्षा टॅक्सी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महासंघाचे म्हणने आहे. परंतू काही युनियनच्या रिक्षाचालकांनी तसेच अन्य रिक्षाचालकांनी रिक्षाचालकांकडून अतिरिक्त भाडेवाढ आकारण्यास सुरवात केली असल्याचे चित्र दिसून येते. अनेक शहरात आजही सर्व रिक्षा मीटरवर धावत नाहीत. यासोबतच लांबचे भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, रात्रीच्या वेळेस महिलांना एकटीने रिक्षातून प्रवास असुरक्षित वाटणे, मद्यपान केलेल्या रिक्षाचालकांची अरेरावी, ग्राहकांना अपमानास्पद वागणूक यांसारख्या समस्यांना सर्वच जिल्ह्यातील प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभाराविषयी किंवा गैरवर्तणुकीविषयी संघटनांनी कधीच आवाज उठविल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. यावर शहरात दिवसेंदिवस रिक्षाचालकांची संख्या वाढत आहे. सर्वच रिक्षाचालक संघटनांशी निगडीत किंवा जोडलेले नाहीत. आमच्यासोबत असलेल्या रिक्षाचालकांना आम्ही ग्राहकांशी योग्य वर्तवणूक ठेवण्याविषयी सांगतो. गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांना शिक्षा करणे, त्यांच्याविरोधात काही पावले उचलणे हे आमचे काम नाही ते आमच्याशी संलग्न नसल्याने आम्ही त्यांच्याविरोधात काही करु शकत नाही असे सांगून आज विविध संघटना आपले हात वर करत आहेत. पहिले आमच्या मागण्या पूर्ण होऊ द्या नंतर प्रवाशांच्या समस्येकडे लक्ष देऊ अशी उत्तरे चक्क संघटनांचे पदाधिकारी देत आहेत.

शहरातील प्रत्येक रिक्षाचालक हा कोणत्या ना कोणत्या संघटनेशी जोडलेला असतो. संघटनेचा पाठिंबा असल्याशिवाय शहरात तो अशी दादागिरी करुच शकत नाही असे मत प्रवाशांनी सकाळकडे व्यक्त केले आहे. संघटनाच अनेकदा अशा रिक्षाचालकांना पाठीशी घालतात. नागरिक हा शासनाचा कळीचा मुद्दा असल्याचे त्यांना माहित असल्याने त्यांच्या मागण्यांसाठी कायम ग्राहकांना वेठीस धरले जाते. परंतू रिक्षाचालकांनी योग्य सेवा दिली तर नक्कीच प्रवाशीही त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्याबाजूने उभे राहतील असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

रिक्षाचालकांच्याही काही समस्या असतील आम्हाला मान्य परंतू त्या प्रत्येक मागणीसाठी कायम प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे आहे. जर त्यांच्या मागण्या रास्त असतील तर सरकार नक्कीच त्याचा विचार करेल. परंतू संघटनांनी जरा आपल्या संघटनेतील रिक्षाचालकांच्या वर्तनाकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. एकदा विभागातील प्रवाशांशी संवाद साधा, त्यावेळी संघटनांना प्रवाशांच्या आणि प्रवाशांना संघटनांच्या अडचणी लक्षात येतील. - लता पाठक, प्रवासी

बंद हा काही मागण्या मान्य करण्याचा उपाय नाही. शहरात संघटनांचे जाळे मजबूत असून त्यांनी रिक्षाचालकांच्या समस्यांसोबतच ग्राहकांच्याही समस्याकडे तेवढेच गांर्भियाने पाहीले पाहीजे. सेवा सुरळीत असेल तर ग्राहकांचाही त्यांना पाठिंबा मिळेल. परंतू रिक्षाचालकांचे वर्तन पहाता त्यांच्यासाठी आज कोणीही ग्राहक त्यांची बाजू घेणार नाही. त्यांना होणाऱ्या त्रासाचाच पाढा वाचेल. यामुळे आधी चालकांचे वर्तन, सेवा सुधारण्य़ाकडे संघटनांनी लक्ष द्यावे. - सुमित वायकर, प्रवासी

या व्यवसायात दररोज नव्या चालकांची भर पडत आहे. युनियन सगळ्यांना बांधिल नाही, उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांना शिक्षा करण्याचा किंवा त्यांच्याविरोधात कोणतीही पावले उचलण्याचा अधिकार युनियनला नाही. वाहतूक पोलिसांचे हे काम असून त्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. आमच्या हातात काहीच नाही. ग्राहकांच्या समस्याही आम्ही नंतर जाणून घेऊ. तुम्ही गेल्या पाच वर्षातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घ्या तोही एक सर्वसामान्य माणूस असून आजच्या त्याच्या कमाईत त्याला घर चालवणेही कठीण झाले आहे. आमच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी आम्ही बंदची हाक पुकारली आहे. - प्रकाश पेणकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com