विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित होणार

भगवान खैरनार
बुधवार, 14 मार्च 2018

महावितरणच्या धोरणानूसार विज बिलाच्या वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांनी या बाबत सहकार्य करणे अपेक्षित आहे. तालुक्यात विज गळतीचे प्रमाण  50 टक्के आहे . त्यामध्ये तांत्रिक बिघाड  25   तर   25   टक्के आकडे टाकून विज चोरीचे आहे. तालुक्यात सुमारे  दिड हजाराच्या दरम्यान थकीत विज बिल ग्राहक आहेत

मोखाडा  - मोखाडा तालुक्यात महावितरण कंपनी कायम वादात राहीली आहे. अवास्तव, अवाजवी आणि मिटर रिडींग न घेता विज बिल आकारणे या कारणांमुळे ग्राहक आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱयांमध्ये वाद होत आले आहेत. असे असले तरी महावितरणने आर्थिक वर्षाच्या अखेरीस विज बिल भरण्यासाठी ध्वनीक्षेपकावरून खेडोपाडी, आठवडेबाजारात दवंडी देणे सुरू केले आहे व महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, विद्युत पुरवठा खंडित करण्याची तंबी ही महावितरण ने ध्वनीक्षेपकावरून दिली आहे.

मोखाडा तालुक्यात 59  गावे आणि  220  पाडे असुन,  लोकसंख्या 86 हजार आहे. यामध्ये 7 हजारांहून अधिक विज ग्राहक कुटूंब आहेत. तालुक्यात कायमच विजेचा लपंडाव सुरू असतो. असे असले तरी महावितरण कडुन अवास्तव, अवाजवी आणि  मिटर रिडींग न घेताच बिल आकारले जात आहे. या बाबींमुळे विज ग्राहक आणि महावितरणच्या अधिकाऱयांमध्ये कायमच खटके उडाले आहेत. आता आर्थिक वर्षाचा अखेर जवळ येऊ लागला आहे. त्यादृष्टीने महावितरणने थकीत आणि चालू बिलाच्या वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. तालुक्यात तांत्रिक बिघाड आणि वीजचोरी मिळुन 50 टक्के विज गळतीचे प्रमाण आहे. त्यास महावितरण आणि जागरूक ग्राहक पायबंद घालण्यास अपयशी ठरले आहे.

विज बिल वसुलीसाठी अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. यावरच न थांबता महावितरण ने आपल्या कार्यालयाच्या गाडीला ध्वनिक्षेपक बसवून, त्यावरून 31 मार्च पूर्वी विज बिल भरण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे.  "मला एव्हढे बिल कसे आले , मला माहीतच नव्हते,'  यासह अन्य कुठलेही कारण न देता विज बिल भरावे अन्यथा आपला विद्युत पुरवठा खंडित केला जाईल अशी तंबी महावितरण ने ध्वनीक्षेपकावरून दवंडी देऊन दिली आहे. 

महावितरणच्या धोरणानूसार विज बिलाच्या वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांनी या बाबत सहकार्य करणे अपेक्षित आहे. तालुक्यात विज गळतीचे प्रमाण  50 टक्के आहे . त्यामध्ये तांत्रिक बिघाड  25   तर   25   टक्के आकडे टाकून विज चोरीचे आहे. तालुक्यात सुमारे  दिड हजाराच्या दरम्यान थकीत विज बिल ग्राहक आहेत.
- आर. ए. एम. सय्यद , सहाय्यक अभियंता. महावितरण कार्यालय, मोखाडा. 

Web Title: konkan news electricity bill mokhada