गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

डबल डेकर एक्‍स्प्रेस 18 डब्यांची, तर तुतारी एक्‍स्प्रेस 19 डब्यांची चालविण्यात येणार आहे.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने एसी डबल डेकर आणि तुतारी एक्‍स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता डबल डेकर एक्‍स्प्रेस 18 डब्यांची, तर तुतारी एक्‍स्प्रेस 19 डब्यांची चालविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक चाकरमान्यांचा हिरमोड होतो. रेल्वेतर्फे गणेशोत्सवात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण याआधीच फुल्ल झालेले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या दोन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हे डबे तात्पुरते वाढविण्यात येणार असून 11085-11086 एलटीटी-मडगाव-एलटीटी एसी डबल डेकर एक्‍स्प्रेसला आता टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचे 9, तर चेअर कारचे 6 आणि जनरेटर कारचे 2 असे एकूण 18 डबे असणार आहेत. 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान हे अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहेत. सध्या ही गाडी 11 डब्यांची चालविण्यात येत आहे; तर 11003- 11004 दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्‍स्प्रेसला आता टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचा एक, स्लीपर क्‍लासचे सात, जनरल क्‍लासचे आठ; तर सेकंड क्‍लासचे दोन असे एकूण 19 डबे असणार आहेत.

22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान हे अतिरिक्त डबे लावण्यात येणार आहेत. सध्या ही गाडी 15 डब्यांची चालविण्यात येत आहे. याशिवाय 22113 -22114 एलटीटी-कोच्चुवेल्ली-एलटीटी एक्‍स्प्रेस कायमस्वरूपी एलएचबी डब्याची चालविण्यात येणार आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Comforts Ganeshotsavan