कोपरखैरणेत वाहतुकीचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

कोपरखैरणे - बेशिस्त वाहनचालक, बेकायदा पार्किंग आणि नियम धाब्यावर बसवणारे रिक्षाचालक व दुचाकीस्वार यामुळे कोपरखैरण्यात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याचा सर्वाधिक फटका वाशी-कोपरखैरणे मार्गावरील पादचारी आणि वाहनचालकांना बसत आहे. राँग साईडने वाहने चालवणे, सिग्नल तोडणे असे प्रकार येथे नेहमीच घडतात.

वाहतूक सुरळीत करणे, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई अशी कामे करणारे वाहतूक पोलिस येथे मात्र केवळ रिक्षातील चौथी सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना दिसतात. तीन-चार वाहतूक पोलिस एखाद्या ठिकाणी उभे राहून हेल्मेट न घातलेले दुचाकीस्वार आणि रिक्षात चौथा प्रवासी बसला असला, तर त्याला पकडतात. परंतु वेगाने वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देणारे दुचाकीस्वार, राँग साईडने वाहने चालवणारे आणि सिग्नल तोडणारे यांच्यावर मात्र कारवाई करताना दिसत नाही. यामुळे त्यांचे फावले आहे. रा. फ. नाईक आणि तीन टाकी चौक येथील सिग्नल वाहनचालक तोडतात. या दोन्ही चौकांत दुतर्फा वाहने उभी केली जातात. नाईक चौकातून वाशीच्या दिशेने बिनदिक्कत वाहने चालवून शॉर्टकटचा वापर केला जातो. यामुळे अपघाताचा धोका तर असतोच; शिवाय तेथे वाहतूक कोंडी होते. सेक्‍टर १४ आणि १५ येथील नाक्‍यांवरही नेहमीच वाहतूक कोंडी असते. येथील बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जात नाही. एनएमएनटीच्या बस थांब्यावरही वाहने उभी केली जातात. त्यामुळे बसमधून उतरताना आणि बसमध्ये चढताना प्रवाशांना कसरत करावी लागते.

रिक्षात चौथा प्रवासी घेणे आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणे हे जीवावर बेतू शकते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाते. वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
- सचिन खोंडरे, सहायक निरीक्षक (वाहतूक)

Web Title: Koparakhairane transport issue