कोपरी प्रभाग समितीला लागणार टाळे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिकेचा कारभार दहा प्रभाग समित्यांमार्फत चालतो. २१ फेब्रुवारी होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर या दहा प्रभाग समित्यांमधील कोपरी प्रभाग समितीला कायमचे टाळे लागण्याची शक्‍यता आहे. या प्रभागातून फक्त चारच नगरसेवक निवडून येणार आहेत. दरम्यान, दिवा प्रभागात दोन नगरसेवकांवरून ११ नगरसेवक निवडणार असल्याने पालिका क्षेत्रात दिवा उपप्रभाग समितीची नव्याने भर पडली आहे.

ठाणे - पालिकेचा कारभार दहा प्रभाग समित्यांमार्फत चालतो. २१ फेब्रुवारी होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर या दहा प्रभाग समित्यांमधील कोपरी प्रभाग समितीला कायमचे टाळे लागण्याची शक्‍यता आहे. या प्रभागातून फक्त चारच नगरसेवक निवडून येणार आहेत. दरम्यान, दिवा प्रभागात दोन नगरसेवकांवरून ११ नगरसेवक निवडणार असल्याने पालिका क्षेत्रात दिवा उपप्रभाग समितीची नव्याने भर पडली आहे.

पालिका क्षेत्राचा कारभार हाकण्यासाठी चितळसर-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर- सावरकरनगर, वागळे इस्टेट, रायलादेवी, नौपाडा, कळवा, मुंब्रा, उथळसर आणि कोपरी या १० प्रभाग समित्यांमधून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. लोकमान्यनगर- सावरकरनगर ही प्रभाग समिती नव्याने स्थापन झालेली आहे. तत्पूर्वी दिवा-शिळ या नव्या प्रभाग समितीची मागणी झाल्याने आता २०१७ च्या प्रशासकीय कामकाजात दिवा उपप्रभाग समिती नव्याने सुरू झाली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि निवडणूक लेखाजोख्यामध्ये या समितीचा उल्लेख केला आहे.

यंदा नव्याने निवडून येणाऱ्या १३१ नगरसेवकांच्या आकडेवारीत चितळसर माजविडा-मानपाडा, रायलादेवी आणि कळवा या समितीत प्रत्येकी १६ नगरसेवक असतील. वर्तकनगर, उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी १२ नगरसेवक असणार आहेत. नौपाडा,वागळे इस्टेट आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी आठ नगरसेवक असतील. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक २० नगरसेवक असतील तर नवीन दिवा-शिळ उपप्रभाग समितीमध्ये ११ नगरसेवक असतील. नव्या सीमांकनानुसार कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात एकच प्रभाग बनल्याने येथे चार नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे चार नगरसेवकांसाठी प्रभाग समितीमध्ये मनुष्यबळ पुरवणे आर्थिकदृष्ट्या सोईचे होणार नसल्याने कोपरी प्रभाग समितीला कायमचे टाळे लागण्याची चिन्हे आहेत. कोपरीतील चेंदणी- कोळीवाडा आणि पूर्व परिसरातील नागरिकांसाठी वागळे प्रभाग समितीमधून कामकाज हाताळले जाण्याची शक्‍यता आहे.

सत्तेचे विकेंद्रीकरण 
भारतीय घटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन लोकोपयोगी करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १८८८ मध्ये संलग्नित असलेल्या कलम ५० या कायद्यात सुधारणा करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्याअनुषंगाने पालिका क्षेत्रामध्ये प्रभाग समित्या तयार करण्यात येतात. प्रत्येक प्रभाग समितीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असतो. याच नगरसेवकांमधून प्रभाग समिती अध्यक्ष निर्वाचित केला जातो, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: kopari prabhag lock