कोपरखैरणेतील गणेशभक्तांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तुर्भे - बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाच वर्षांपूर्वी कोपरखैरणे सेक्‍टर १२ मध्ये तयार केलेल्या तलावाची जमीन सिडकोने विकल्यामुळे तो बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या वेळी गणेश विसर्जन कुठे करायचे? असा प्रश्‍न येथील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला आहे. तलाव बुजवण्याचे काम सुरू असताना पालिकेने त्याला हरकत घेतली नसल्याने नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे.

कोपरखैरणे आणि कोपरी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने कोपरखैरणे सेक्‍टर १२ येथील सिडकोच्या भूखंडावर २०१३ मध्ये तलाव तयार केला होता. तेथे बोनकोडे गाव, सेक्‍टर ९, १०, ११ व १२ परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते; परंतु आता हा भूखंड सिडकोने विकला असल्याने यंदा या परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यामुळे येथील गणेशभक्तांना विसर्जनासाठी तीन-चार किलोमीटरवरील कोपरखैरणे व कोपरी तलाव येथे जावे लागणार आहे. 

पालिकेचे दुर्लक्ष आणि सिडकोला सुटलेली पैशांची हाव यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी केला आहे. गेल्या वर्षी या तलावात ८०० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. कोपरखैरणे तलावात चार हजार तर कोपरी तलावात दोन हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. याबाबत सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मनोहर निनावे यांना विचारले असता, या संदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्यास सांगतो, असे त्यांनी सांगितले.

या तलावामुळे परिसरातील गणेशभक्तांची चांगली सोय झाली होती. हा भूखंड सिडकोने विकू नये यासाठी पत्रव्यवहार केला होता; परंतु पालिका प्रशासनाचा सिडकोसोबतचा संपर्क कमी पडल्याने तो त्यांनी विकला. यात सिडकोने नागरिकांची मागणी विचारात घेणे गरजेचे होते. 
- रामदास पवळे, नगरसेवक

Web Title: Koparkhavarne Sector 12 lake