मुंबई - दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर (वय 87) यांचे सोमवारी (ता. 1) पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
कृष्णा यांच्या पार्थिवावर संध्याकाळी चेंबूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णा यांच्या नाती करिना कपूर, करिष्मा कपूर यांसह सैफ अली खान, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, काजोल, प्रेम चोप्रा यांच्यासह कृष्णा यांची मुलगी रितू नंदा आणि त्यांची सून श्वेता नंदा, सोनम कपूर, संजय कपूर, आमीर खान, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, अनिल कपूर, करण जोहर, वरुण धवन, आलिया भट्ट, आयान मुखर्जी, संजय आणि मान्यता दत्त हे अंत्यदर्शनासाठी पाली हिल येथील "कृष्णाराज' बंगल्यावर आले होते.
कृष्णा यांचे निधन पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती त्यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी दिली. कृष्णा यांचा विवाह 1946 मध्ये राज कपूर यांच्याशी झाला होता. ऋषी कपूर नुकतेच वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. कृष्णा यांच्या निधनानंतर अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विविध मान्यवरांनी ट्विटरवरून कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
|