कृपाशंकर सिंह आदित्य ठाकरेंच्या प्रचारात 

कृपाशंकर सिंह आदित्य ठाकरेंच्या प्रचारात 

मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे एकेकाळचे उत्तर भारतीय जनतेचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कृपाशंकर सिंह मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसत नसल्याने ते नक्की कोठे गेले अशी चर्चा सुरू होती. मात्र, कृपाशंकर सिंह दोन दिवसांपूर्वी एका प्रचारात दिसले. विशेष म्हणजे हा मोर्चा कॉंग्रेस किंवा भाजपच्या उमेदवाराचा नसून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा होता.

कृपाशंकार हे आदित्यच्या प्रचारासाठी थेट वरळीत पोहोचले होते. या आश्‍चर्यकारक घडामोडींमुळे कृपाशंकर सिंह भाजपमध्ये आहेत की शिवसेनेत आहेत, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. वरळीत रविवारी उत्तर भारतीयांची वरळी हिल इस्टेट या परिसरात शिवसेनेने मिटिंग घेतली होती. या मिटिंगला कृपाशंकर उपस्थित असल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेनेचे विभागप्रमुख आशीष चेंबूरकरही या वेळी उपस्थित होते.

सुनील शिंदे यांनी भाषणाला हिंदीत सुरुवात केली आणि आपल्याला हिंदी चांगले येत नाही; पण आजूबाजूला हिंदी भाषिक आहेत असे त्यांनी नमूद केले. यावर कृपाशंकर यांनी "तुम्ही मराठीत बोला' आम्ही समजून घेऊ असे सांगितले. मात्र, तरीही सुनील शिंदे यांनी हिंदीतच भाषण केले. कृपाशंकर गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या केबिनमध्ये कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची गर्दी असायची, असे सांगत शिवसेना आणि सिंह यांचा ऋणानुबंध फार जुने असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसचे माजी आमदार म्हणून राज्यमंत्री होते; तसेच ते मुंबई कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्षही होते. त्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांना या घोटाळ्यात निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर अचानक महिनाभरापूर्वी कृपाशंकर पुन्हा चर्चेत आले होते. विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेलेले कृपाशंकर हे भेट झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर येताना आपण कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याचे पत्रकारांसमोर जाहीर केले.

काश्‍मीरमधील स्वायत्ता रद्द करण्याबाबत कॉंग्रेसने घेतलेली भूमिका न पटल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण पुढे काही घडलेच नाही. मुंबईतील उत्तर भारतीयांचा चेहरा असलेले या निवडणुकीच्या मैदानात कोठेच दिसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंह यांचे सलोख्याचे संबंध होते. पण ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत नव्हते. दिसले ते थेट आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com