KSRTC.jpg
KSRTC.jpg

कर्नाटकच्या एसी बसचे तिकीट वाढवा!

मुंबई : कर्नाटक परिवहन मंडळाच्या वातानुकूलित बससेवेच्या तुलनेत महाराष्ट्राच्या एसटीचे तिकीटदर जास्त आहेत. त्यामुळे शिवशाही, शिवनेरी एसी सेवांकडील प्रवाशांचा ओघ घटला आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या एसी बसचे भाडे वाढवावे, असे पत्र महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पाठवले. बंगळूरुचा वातानुकूलित प्रवास महागण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाबाबतच्या तक्रारी आणि सुविधांच्या अभावामुळे शिवशाही बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आंतरराज्य मार्गांवर वातानुकूलित प्रवासासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या तुलनेत कमी भाडे आकारले जाते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वातानुकूलित बससेवेला फटका बसला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाला एसी बसचे तिकीट वाढवण्याची विनंती पत्राद्वारे केल्याचे समजते. आंतरराज्य प्रवासासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार संबंधित राज्यात प्रवेश केल्यानंतर तेथील बसभाडे लागू करणे आवश्‍यक असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

ऐरावतला प्रवाशांची पसंती 
एसटीची वातानुकूलित शिवशाही सेवा आणि कर्नाटकमधील ऐरावत सेवा यांच्या तिकीट दरांत मोठी तफावत आहे. मुंबई-बंगळूरु मार्गासाठी एसी शिवशाहीचे भाडे 1874 रुपये, तर व्होल्वो ऐरावतचे भाडे 1260 रुपये आहे. कमी तिकीट, अत्याधुनिक सुविधा आणि बसमधील स्वच्छता या कारणांमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची कर्नाटकी ऐरावतला पसंती मिळत आहे. एसटीच्या शिवशाही बसगाड्या कर्नाटक परिवहनच्या ऐरावत बससारख्या "हाय-टेक' नाहीत. ऐरावत बससेवेचे तिकीटदरही तुलनेने कमी आहेत. 

कर्नाटकला शक्‍य, महाराष्ट्राला का नाही? 
कर्नाटकला व्होल्वो बनावटीच्या ऐरावत बसचे तिकीट कमी ठेवणे परवडते; मग महाराष्ट्राला साध्या बनावटीच्या शिवशाहीचे भाडे का कमी करता येत नाही, असा प्रश्‍न प्रवासी विचारत आहेत. नादुरुस्त आणि अपघातप्रवण बस अशी शिवशाही सेवेची ओळख झाली आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने भाडे कमी करण्यापेक्षा कर्नाटकलाच भाडे वाढवण्यासाठी पत्र पाठवल्यामुळे ऐरावतच्या प्रवाशांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

तुलनात्मक भाडे (रुपयांत) 
मार्ग                         एमएसआरटीसी             केएसआरटीसी 
                             शिवशाही/शिवनेरी                ऐरावत 
मुंबई-स्वारगेट               449                              361 
बोरिवली-पुणे                 514                              364 
मुंबई- बंगळूरु              1874                             1260 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com