भिवंडी पालिकेसमोर ‘कुर्बानी’ पेच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे. या सणाला दरवर्षी स्लॅटर हाऊसव्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या सेंटरची उभारणी भिवंडी पालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईद सणाच्या तोंडावरच रस्त्यावर कुर्बानी करण्यास मनाई केल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

भिवंडी : मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे. या सणाला दरवर्षी स्लॅटर हाऊसव्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या सेंटरची उभारणी भिवंडी पालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईद सणाच्या तोंडावरच रस्त्यावर कुर्बानी करण्यास मनाई केल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी मुंबई पालिकेसह सर्व महापालिकांना यापुढे रस्ते, पदपथ, सोसायटी परिसरात तात्पुरत्या कुर्बानी सेंटरला परवानगी देऊ नये, तसेच दिलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे भिवंडीतील विश्‍व हिंदू परिषद, गोवंश संवर्धन परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी अशोक जैन व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब आणि पोलिस उपायुक्त यांना निवेदन दिले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शहरात 38 कुर्बानी सेंटरच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

भिवंडी पालिकेच्यावतीने बकरी ईदनिमित्त शहरातील विविध भागात कुर्बानी सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. पालिकेकडून यासाठी सुमारे 60 लाखांहून अधिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. हा सण तीन दिवस साजरा होणार असल्याने सुमारे 30 कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब, मार्केट विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे व महापौर जावेद दळवी यांनी आरोग्य विभागाचे विभागप्रमुख व प्रभाग अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेऊन ईदनिमित्त तयारी सुरू केली आहे. याबाबत आयुक्त अशोकुमार रणखांब, उपायुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

या ठिकाणी कुर्बानी सेंटर 
भिवंडीतील 1 ते 5 प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या बाला कम्पाऊंड, खंडुपाडा, रहेमत पुरा, गैबीनगर, मिल्लतनगर, फंडोळेनगर, पिराणीपाडा, पटेलनगर, धामणकर नाका, अजमेरनगर, नारपोली, शास्त्रीनगर, इदगाहरोड, दर्गारोड, आजमीनगर, समदनगर, म्हाडा कॉलनी अशा नागरीवस्ती असलेल्या ठिकाणी कुर्बानी सेंटर उभारण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Kurbani' pech in front of Bhiwandi Municipality