esakal | श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुंबई अहमदाबाद महामार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुंबई अहमदाबाद महामार्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अहमदाबाद महामार्गावरील खड्डे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोय होत आहे. त्यामुळे महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आयडियल रोड बिल्डर कंपनी विरोधात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या आदेशाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास महामार्गावर एकाच वेळी चौदा ठिकाणी आंदोलन करण्यात आले.आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते,जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पद्धतीने काही वेळ महामार्ग रोखण्यात आला होता.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर वर्सोवा ब्रिजलगत,ससू नवघर,मालजी पाडा नवीन उड्डाणपूलावर तसेच चिंचोटी भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने वाहनचालक आणि प्रवाश्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.निर्बंधांमुळे लोकल ट्रेन मधून प्रवास न करू शकणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास होत असून नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत आहे. नेहमीच्या वाहतूक कोंडी मुळे अतिरिक्त इंधन जळत असल्याने व्यावसायिक माल वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी श्रमजीवी संघटनेला प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे गुरुवारी (ता.02) आयडियल रोड बिल्डर विरोधात श्रमजीवी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पालघर तालुक्यातील वरई फाटा, जव्हार फाटा, चिल्हार फाटा आणि बऱ्हाणपूर फाट्यावर श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.जव्हार फाटा येथे दहा मिनिटे महामार्गावरील वाहतूक आंदोलन कर्त्यांना रोखून धरली होती.यावेळी आयडियल रोड बिल्डर विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पोलिसांच्या विनंतीनुसार आंदोलन कर्ते रस्त्यावरून हटले आणि मनोर जव्हार रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिल्हार फाटा येथे उड्डाणपूलाखाली एक मार्गिका अडवली होती.याठिकाणी गाणी आणि घोषणाबाजी केली जात होती. वरई फाटा येथे वरई पारगाव रस्ता काही वेळ आंदोलन कर्त्यांनी अडवला होता.

दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत आयडियल रोड बिल्डरचे अधिकारी,पोलीस आणि श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी सायंकाळी बैठक पार पडली.बैठकीत आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात सांगितले होते.

मंगळवारी दुपारी महामार्गावरील मालजी पाड्याजवळच्या पठार येथे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,सरचिटणीस विजय जाधव यांची आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांनी भेट घेत चर्चा केली.महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून गणेशोत्सव सुरू होण्याआधी महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.तलासरी तालुक्यातील आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी केले,तर पालघर तालुक्याच्या हद्दीतील आंदोलन श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार,नरेश वरठा यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

वसई तालुक्यात ससूनवघर, चिंचोटी, शिरसाड, पेल्हार, सकवार, खनिवडे टोल नाका, पालघर तालुक्यातील वरई फाटा, मस्तान नाका,चिल्हार फाटा, सोमटा,डहाणू तालुक्यात चारोटी टोल नाका तलासरी तालुक्यात दापचरी,आमगाव आणि आच्छाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

"महामार्गवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मालजी पाडा उड्डाणपूलावर पाउस थांबल्या नंतर डांबराचा नवीन थर टाकण्यात येणार आहे.वर्सोवा ब्रिजच्या सुरुवातीचा रस्ता नवीन पूल तयार करणाऱ्या VMC या कंत्राटदाराकडे आहे.त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून दुरुस्ती बाबत सुचना देण्यात आल्या आहेत."

- प्रवीण भिंगारे, जनसंपर्क अधिकारी, आयडियल रोड बिल्डर.

loading image
go to top