वाड्यात रुग्णांवर व्हरांड्यात उपचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

वाड्यातील रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधांमुळे गैरसोय; सुविधांची वानवा 

वाडा ः बदलत्या वातावरणामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येसमोर वाडा ग्रामीण रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याने अनेकांना व्हरांड्यातच उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असतानाच त्यांच्या नातेवाईकांचीही सोई-सुविधांअभावी गैरसोय होत आहे. 

वाडा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयास 50 वर्षांहून अधिक वर्षे झाली असून वाढत्या लोकसंख्येच्या मानाने हे रुग्णालय अपुरे पडत आहे. वाडा हे ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विक्रमगड, मोखाडा तालुक्‍यातील सूर्यमाळ, खोडाळा, तर शहापूर तालुक्‍यातील आघई आणि भिवंडी तालुक्‍यातील अंबाडी या परिसरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

रुग्णालयात फक्त 30 खाटा असल्याने विशेषतः पावसाळ्यात रुग्णांना व्हरांड्यातच गाद्या टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाईकांना धर्मशाळा नसल्याने रुग्णालयात रहावे लागत आहे. रुग्णालयात रोज 250 ते 400 च्या आसपास बाह्यरुग्णांची, तर 40 ते 50 आंतररुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात.  रुग्णांचा अतिरिक्त भार रुग्णालयावर पडत असल्याने या रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत आहेत.

वाडा ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा आहेत. पावसाळ्यात रुग्णांची संख्या जास्त असल्याने नाईलाजास्तव रुग्णांना व्हरांड्यात झोपावे लागत असून तेथेच त्यांच्यावर उपचार करावे लागत आहे. 
डॉ. प्रदीप जाधव, वैद्यकीय अधीक्षक, वाडा ग्रामीण रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of facilities at the Wada hospital near Mumbai