Mumbai : अभ्यास नसल्याने पालिकेचा खर्च वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

expenses

अभ्यास नसल्याने पालिकेचा खर्च वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील भूमिगत जलवाहिन्यांचा आराखडा नसल्याबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाला नगरसेवकांनी धारेवर धरले. त्याचा फटका महापालिकेलाही बसला. अंधेरीच्या तेलीगल्ली येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना भूमिगत जलवाहिन्यांमुळे पुलाच्या आराखड्यात बदल करावा लागला. त्यामुळे पुलाच्या खर्चात १७ कोटींनी वाढ झाली आहे.

अंधेरी पूर्व येथील उड्डाणपुलाच्या ग्रेड सेपरेटरचे काम महापालिकेने २०१६ मध्ये सुरू केले. १०१ कोटी २३ लाख रुपयांचे हे काम ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत होणे अपेक्षित होते. त्यापूर्वी अंधेरी रेल्वे मार्गावरील गोखले पुलाची मार्गिका कोसळल्यावर पालिकेने या पुलाचे ऑडिट करून घेतले. त्यानुसार या पुलाच्या जीर्ण झालेल्या दोन्ही बाजूच्या उतारांना स्ट्रक्‍चरल सपोर्ट देणे गरजेचे होते. हे कामही त्याच कंत्राटदाराकडून करून घेतले.

त्याचबरोबर तेलीगल्ली येथील पुलाचे काम सुरू असताना १२०० आणि १४०० मिमी व्यासाच्या दोन भूमिगत जलवाहिन्या असल्याचे आढळले. त्यामुळे पुलाच्या सर्वसाधारण आराखड्यात बदल करण्यात आला. भूमिगत वाहिन्यांवरून पोर्टल फ्रेमचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पुलाच्या कामासाठी लागणारे कॉंक्रिट, स्टील तसेच बेअरींगमुळे बांधकाम खर्चात वाढ झाली, अशी माहिती प्रशासनाने गुरुवारी (ता. १९) होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

नॉईस बॅरिअरचा खर्च वाढला

या पुलाच्या दोन्ही बाजूला ध्वनीप्रतिबंधक दुभाजक (नॉईस बॅरिअर) लावण्यात आले. त्यामुळे या पुलाचा खर्च १२७ कोटी ८६ लाखांपर्यंत पोहोचल्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडला आहे.

loading image
go to top