रोपलागवडीसाठी जागेचा अभाव 

सुजित गायकवाड
शुक्रवार, 7 जून 2019

राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही.

नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर पालिकेने रायगड जिल्हा परिषदेच्या सामाजिक वनीकरण विभागाला गळ घातली आहे. महापालिकेच्या विनंतीला जिल्हा परिषदेने मान दिला असून जिल्हा परिषद एक लाख झाडांची स्वखर्चाने लागवड करणार आहे. 

भाजप सरकारच्या काळापासून सुधीर मुनगंटीवार यांनी ही रोपलागवड करण्याची योजना सुरू केली आहे. सुरुवातीला 13 कोटी रोपलागवड करण्याचे आव्हान आता थेट 33 कोटींवर येऊन पोहोचले आहे; मात्र हे आव्हान एकट्या वन विभागाला लागू केले नसून राज्यभरातील सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पेलायचे आहे. नवी मुंबई महापालिकेला एक लाख झाडांची लागवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी पालिकेने वन विभागाला 25 हजार झाडे देऊ केली; तर उर्वरित 50 हजार झाडे अद्याप लावण्याचे काम पालिकेमार्फत सुरू आहे. शहरात जागा शिल्लक राहिली नसल्याने महापालिकेने नाल्यांशेजारील मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडेच्या मोकळ्या जागा, पदपथांच्या शेजारील मोकळ्या जागा हेरून झाडे लावली आहेत. आता शहरात मोकळी जागा नसल्याने मोरबे धरणावरील मोकळ्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. तरीही महापालिकेच्या डोक्‍यावर 25 हजार झाडे लावण्याचे नियोजन करणे शिल्लक आहे. 

गेल्या वर्षीच रोपलागवडीची विदारक परिस्थिती असताना आता पुन्हा महापालिकेच्या माथी मारलेल्या एक लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. या आव्हानातून मार्ग काढण्यासाठी अखेर पालिकेने रायगड जिल्हा परिषदेला झाडे लावण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आता महापालिकेला मिळणारी एक लाख रोपे सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा परिषद रायगड जिल्ह्याच्या हद्दीत लावणार आहे. तसेच त्यांच्या देखभालीचा खर्चही जिल्हा परिषद उचलणार आहे. 

कुठे लावणार झाडे? 
गेल्या वर्षी महापालिकेने इलठणपाडा येथे 25 हजार रोपे लावली. त्यानंतर अमृत योजनेंतर्गत घणसोली नाला, वाशीतील स्वामी नारायण मंदिर, नेरूळमधील ज्वेल्स पार्क येथे 15 हजार झाडे लावली. नेरूळजवळील ज्वेल्स पार्कच्या मोकळ्या जागेत 15 हजार झाडे लावण्याचे काम अद्यापही सुरू आहे. शीव-पनवेल महामार्गावर सहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. पारसिक हिल- तीन हजार झाडे, सानपाडा- 1500 झाडे, वाशी रघुलीला मॉल- 800 झाडे, घणसोली सेंट्रल पार्क- 500, बेलापूर जॉगिंग ट्रॅक- 500, भीमाशंकर सोसायटी- 500 झाडे लावणार आहे. 

सर्वाधिक वृक्षसंपदा 
पर्यावरण दिनानिमित्ताने दरवर्षी नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत लाखो झाडे लावण्यात येतात. त्यामुळे शहरात तब्बल नऊ लाख वृक्ष असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले. याखेरीज केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गतही शहरात रस्त्याशेजारी नाले, पदपथ आदी ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत सर्वाधिक वृक्षसंपदा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lack of space for plant cultivation