लालबागच्या राजा चरणी पाच कोटींचे दान; आणखी दोन दिवस चालणार नोटांची मोजणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवात मुंबईसह राज्य व देशभरातील गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात. दर्शनासाठी आलेले भाविक राज्याच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकतात, दानपेटीत गणेशभक्तांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम पेटीत टाकली आहे.

मुंबई : गणेशोत्सवातील मुसळधार पाऊस किंवा देशातील आर्थिक मंदीचा कुठलाही परिणाम लालबागच्या राजाच्या खजिन्यावर दिसत नाही. यंदा भाविकांनी लालबागचा राजाचरणी रोख रक्कम, सोने, चांदी, असे भरभरुन दान टाकले आहे. आतापर्यंत पहिल्या 9 दिवसाची रक्कम मोजली असून 5 कोटी 5 लाख 30 हजार रोख रुपये जमले आहेत. तर 3किलो 665 ग्रॅम सोने, 56 किलो 716 ग्रॅम चांदीनी राजाचा खजिना भरुन गेला आहे.

गणेशोत्सवात मुंबईसह राज्य व देशभरातील गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात. दर्शनासाठी आलेले भाविक राज्याच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकतात, दानपेटीत गणेशभक्तांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम पेटीत टाकली आहे. नोटांची मोजणी अजूनही सुरु आहे. अजूनही दोन दिवस मोजणी चालेल अशी माहिती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले.

90 जणांची टीम मोजणीसाठी कार्यरत असून यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, सल्लागार यांचा समावेश आहे. यंदा पावसातही भाविकांची विक्रमी गर्दी पाहता राजाच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाची रक्कमही मोठी आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही रक्कम कोटीवर जाईल असेही दळवी यांनी सांगितले.

- साताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी उतरवणार तगडा उमेदवार!

केवळ रोख रक्कम नाही तर भाविक राज्याच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात सोन्या चादीचे विविध अलंकारही टाकले आहेत. चांदीचे मोदक, आणि सोन्या चांदीचे अनेक दागिने अशा प्रकरच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. रोख रक्कमेत अमेरिकन डॉलर अशा परदेशी चलनाचाही समावेश आहे.

यंदा एका भाविकांने सोन्याचं ताट, दोन वाट्या, एक ग्लास, दोन चमचे राजाच्या दान पेटीत अर्पण केले आहेत. तर एका भाविकाने सोन्याची विट अर्पण केली आहे. दानपेटीत चांदीच्या आकर्षक वस्तू आल्या आहेत. एका भाविकाने तब्बल अर्धा किलो वजनाची पावले राजाच्या चरणी जमा केली आहेत.

- राजू शेट्टी म्हणतात, 'ईडीमार्फत 'कडकनाथ'ची चौकशी करा, नाहीतर...'

गणेशोत्सव काळात मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र भर पावसात भाविकांची गर्दी ही कमी झाली नव्हती. गर्दी विसर्जन मिरवणूकीला कायम होती असे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले. सोन्या चांदीच्या वस्तूचा लिलाव भाविकांसाठी सोमवारी आयोजित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalbaugcha Raja Receives Donation Worth Rs 5 crore