पश्‍चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गासाठी तातडीने भूसंपादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वांद्रे-विरार उन्नत मार्गालाही वेग

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वांद्रे-विरार उन्नत मार्गालाही वेग
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गासाठी आवश्‍यक असलेल्या भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वांद्रे-विरार उन्नत मार्गासाठीच्या "स्टेट सपोर्ट ऍग्रीमेंट'बाबतही सहमतीने लवकरच पुढील पावले उचलावीत, असे या वेळी ठरले.

मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदींनी सिडको, महापालिका आदींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर रेल्वेच्या राज्यातील अपूर्ण प्रकल्पांबाबत बैठक घेतली. राज्यातील रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचेही या वेळी ठरवण्यात आले. त्यासाठी भूसंपादन, निधीवाटप, रेल्वेमार्गाकडे जाणारे रस्ते पूर्ण करणे ही कामे राज्य सरकार लवकरच पूर्ण करील, अशी हमी राज्य सरकारने दिली.

या वेळी राज्यातील पुढील प्रकल्पांबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. नगर-बीड-परळी यादरम्यानच्या नव्या मार्गासाठी भूसंपादन त्वरित करण्यात येईल. हे काम परळीतूनही लगेच सुरू होईल. वर्धा-नांदेड या नव्या मार्गासाठीचे भूसंपादनही सरकार तातडीने करील आणि ती जमीन रेल्वेला हस्तांतरित करील. जळगाव येथील शिवाजी नगर उड्डाणपुलाची पुनर्बांधणी होणार असून, त्याचा खर्च राज्य सरकार व रेल्वे निम्मा-निम्मा करील. अचलापूर-मूर्तिजापूर-यवतमाळ व पुलगाव-आर्वी या नॅरोगेज मार्गांचा विस्तार केला जाईल आणि हा खर्चही सरकार व रेल्वे विभागून करील. आर्वी-वरूड या नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, त्याचा अहवाल रेल्वेला दिला जाईल. वडस-गडचिरोली मार्गासाठी भूसंपादन सुरू असून, ते काही महिन्यांत पूर्ण होईल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: land aquisition for western railway sixth route