भूमिपुत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

९५ गावांच्या विस्तारित गावठाणातील जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड भूमिपुत्रांना मिळावे, या मागणीसाठी ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने नगरविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश सागर यांची मंगळवारी (ता.२०) भेट घेतली. 

नवी मुंबई : ९५ गावांच्या विस्तारित गावठाणातील जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड भूमिपुत्रांना मिळावे, या मागणीसाठी ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने नगरविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश सागर यांची मंगळवारी (ता.२०) भेट घेऊन भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

विस्तारित गावठाणाच्या नियमितीकरणाच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांच्या धारण क्षेत्राचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड म्हणजेच महसुली सर्वेक्षणाचे असताना त्याबाबत दिरंगाई करण्यात येत असून, सिडको अधिकाऱ्यांकडूनही दिशाभूल होत असल्याची तक्रार या वेळी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांकडे केली. सिडकोचा ठराव क्र. ९९४९ (जे) २२ जानेवारी २०१० रोजी शासनाद्वारे संमत झालेला आहे. त्याअन्वये भूमिपुत्र विस्तारित गावठाणातील जमिनीचे दरही शासनास अदा करण्यास तयार असल्याने शासनाचे कोणतेही नुकसान होणार नसून, भूमिपुत्रांना त्वरेने नगर भूमापन प्रक्रिया सुरू करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, अशी मागणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. 

सरकार भूमिपुत्रांच्या सोबत आहे. भूमिपुत्रांना विस्तारित गावठाणातील जमिनीचा अधिकार देण्यासाठी सकारात्मक असून, त्या संदर्भात लवकरच प्रशासकीय पावले उचलली जातील, अशी ग्वाही या वेळी राज्यमंत्री योगेश सागर यांनी फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या शिष्टमंडळात नीलेश पाटील, अविनाश सुतार, अनिकेत पाटील, प्रेमनाथ भोईर आणि मनीष पाटील उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landlords should get a property card