भांडुपच्या डोंगरावर दरडींची भीती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

भांडुप - भांडुपच्या खिंडीपाडा-पाइपलाईन परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असून तेथील सुरक्षा भिंतींवरच नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. 

भांडुप - भांडुपच्या खिंडीपाडा-पाइपलाईन परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असून तेथील सुरक्षा भिंतींवरच नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. 

भांडुपच्या पाइपलाईन भागात डोंगरांवर हजारोंची लोकवस्ती आहे. खिंडीपाडा डोंगराळ भागात झोपडपट्ट्यांतील रहिवासी सध्या भीतीच्या छायेखाली राहत आहेत. त्यातच पाणी, वीज आणि स्वच्छतागृहांचीही वानवा आहे. पावसात दरडींचा धोका असल्याने रहिवासी भीतीच्या सावटाखालीच वावरतात. इथे बेकायदा घरे बांधण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्‍न मोठा आहे. डोंगराळ भागात सर्व टोकापर्यंत घरे बांधली आहेत. पावसाळ्यात डोंगराळ भागात दरडी कोसळून होणारी हानी टाळण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे; मात्र त्यावरच घरे बांधल्याने पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते. 

नगरसेविकेचे मौन
दरडींमुळे नागरिकांचा जीव धोक्‍यात असला तरी महापालिकेकडून त्याबाबत कसलीही दखल घेतली गेल्याचे दिसत नाही. स्थानिक नगरसेविका संगीता गोसावी यांना संरक्षण भिंतीविषयी विचारण्यास संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

अनेकदा दरडी कोसळल्या होत्या. संरक्षण भिंत बांधल्यापासून सहसा दरडी कोसळत नाहीत; मात्र या भागात बेकायदा उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांतील रहिवाशांच्या जीवाला धोकाच आहे.  - सचिन नारे, स्थानिक

भांडुपमध्ये घर घेणे आमच्यासारख्यांना परवडणारे नसल्याने आम्ही या डोंगरावर घर घेतले आहे. ही घरे बेकायदा आहेत; मात्र आमच्याकडे पर्यायही नाही. 
- रमाकांत गावडे, रहिवासी

Web Title: landslide dangerous on the hill of Bhandup