लोकलमधून लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

लोकलमध्ये प्रवाशांनी रॅकवर ठेवलेल्या लॅपटॉपच्या बॅगा चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : लोकलमध्ये प्रवाशांनी रॅकवर ठेवलेल्या लॅपटॉपच्या बॅगा चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सरबानकुमार लक्ष्मण महान्तो (वय 21) असे गुन्हेगाराचे नाव असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एक व्यक्ती चोरीचे लॅपटॉप विक्री करण्यासाठी अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता आरोपीकडे एक मोबाईल, एक लॅपटॉप, अन्य व्यक्तींच्या नावाची चार डेबिट-क्रेडिट कार्ड आढळली. त्याची अधिक चौकशी केली असता, आरोपीने चर्चगेट ते बोरिवली लोकलच्या एका डब्यातील रॅकवरून बॅग चोरल्याची कबुली दिली. त्या बॅगेतील लॅपटॉपची विक्री करण्यासाठी आपण आल्याचे त्याने सांगितले. 

आरोपी हा बिहारचा असून तो मुंबईत कोणत्याही रेल्वेस्थानक, बसस्थानकाजवळ किंवा फूटपाथवर वास्तव्यास असतो. लोकल प्रवासात तो स्वतःची चांगल्या प्रतीची बॅग रॅकमधील अन्य प्रवाशांच्या बॅगजवळ ठेवतो आणि दरवाजावर येऊन उभा राहतो. रॅकवरील बॅगांची टेहळणी केल्यानंतर कोणत्या बॅगेत लॅपटॉप आहे, याबाबत खात्री करतो. खात्री झाल्यानंतर तो स्वतःची बॅग तेथेच ठेवून लॅपटॉप असलेली बॅग उचलून पुढील स्थानकावर उतरून पसार होतो. अशा प्रकारे चोरी केलेल्या लॅपटॉपची तो स्वस्त दरात विक्री करतो. त्याच्याविरोधात बोरिवली, वडाळा, दादर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असून त्यास यापूर्वी अटक झालेली आहे. दीड महिन्यापूर्वीच त्याची तुरुंगातून मुक्तता झाली होती. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laptop thief arrested