अखेरचे 24 तास ठरले महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

घाटकोपर - मुंबईच्या राजकीय मैदानात सर्वच पक्ष ताकदीने उतरले खरे; पण सर्व प्रभागात उमेदवार शोधताना पक्षांची तारांबळ उडाली. आयत्या वेळी उमेदवारांना अर्ज देऊन अनेक पक्षांनी पवित्र केले. 24 तासांत शिवसेना-भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर घाटकोपर येथील एका बंडखोराचा गळ्यात अर्ज भरण्यासाठी काही मिनिटे उरलेली असताना कॉंग्रेसने उमेदवारीची माळ घातली.

घाटकोपर - मुंबईच्या राजकीय मैदानात सर्वच पक्ष ताकदीने उतरले खरे; पण सर्व प्रभागात उमेदवार शोधताना पक्षांची तारांबळ उडाली. आयत्या वेळी उमेदवारांना अर्ज देऊन अनेक पक्षांनी पवित्र केले. 24 तासांत शिवसेना-भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर घाटकोपर येथील एका बंडखोराचा गळ्यात अर्ज भरण्यासाठी काही मिनिटे उरलेली असताना कॉंग्रेसने उमेदवारीची माळ घातली.

घाटकोपर पश्‍चिममधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे तीन-चार महिन्यांपासून भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. भाजपकडून त्यांना निश्‍चित आश्‍वासन मिळत नव्हते. म्हणून त्यांनी शिवसेनेचीही चाचपणी केली. उमेदवारी अर्ज भरण्याला 24 तास उरलेले असतानाही त्यांनी दोनपैकी एका पक्षातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजप आणि शिवसेनेकडून शेवटपर्यंत कोणतेही आश्‍वासन दिले जात नव्हते. अखेर घुगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारीही केली; मात्र आयत्या वेळी कॉंग्रेसच्या नेत्यांचा फोन आला. त्यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. उमेदवारी जाहीर झाली; पण प्रत्यक्ष पक्षाचा अर्ज भरण्यासाठी काही तासच उरले होते. अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी कॉंग्रेसची उमेदवारी पदरात पाडून घेतली.

अर्ज न भरताच माघारी
अंधेरी येथील 60 क्रमांकाच्या प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून माजी उपमहापौर अरुण देव आपला लवाजमा घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. ते निवडणूक कार्यालयात पोहचलेही; पण त्यांचा मोबाईल खणखणला. ते कोणाशी काय बोलले, हे गुलदस्त्यातच आहे; पण त्यांनी भरलेला अर्ज मागे घेतला आणि घरी निघून गेले.

ऐन वेळी उमेदवारी नाही
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे विश्‍वासू साथीदार अजय बागल यांना काल घाटकोपर पंतनगरमधून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांनी अर्ज भरण्याची तयारीही केली होती; मात्र रात्री भाजपने जाहीर केलेल्या यादीतून त्यांचे नाव कापण्यात आले. त्यांच्या जागी माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली. अशीच परिस्थिती मेहता यांच्या मुलाची झाली. हर्ष मेहता यांना घाटकोपरमधील कुठल्याही प्रभागातून उमेदवारी दिली जाणार होती; मात्र त्यांना उमेदवारी मिळालीच नाही.

Web Title: last 24 hours were important