विमानतळासाठी सपाटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सपाटीकरण करण्याचे काम तर ९० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित १० टक्के कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासन करत आहे. कोंबडभुजे आणि मोठा उलवे गावाचेही स्थलांतर पावसाळ्यापूर्वी अपेक्षित आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सपाटीकरण करण्याचे काम तर ९० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित १० टक्के कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासन करत आहे. कोंबडभुजे आणि मोठा उलवे गावाचेही स्थलांतर पावसाळ्यापूर्वी अपेक्षित आहे.

सिडको १ हजार १६० हेक्‍टरवर १६ हजार कोटी रुपये खर्च करून हा विमानतळ उभारत आहे. तीन टप्प्यांमध्ये त्याचे काम होणार आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०१९ अखेरीस पूर्ण होणार आहे. ही ‘डेडलाईन’ चुकू नये याकरिता युद्धपातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करणे, भराव टाकून जमीन सपाटीकरण करणे या कामांचा समावेश आहे. ही कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. उच्च दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम बाकी असून, उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे कामही वेगात सुरू आहे. गणेशपुरी ते चिंचपाडापर्यंतचे सपाटीकरणाचे कामही बहुतांश पूर्ण झाले आहे.  दक्षिणेकडील साडेतीन किलोमीटरच्या धावपट्टीसाठी सपाटीकरण करण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी पावसाळ्यापूर्वी सपाटीकरण, प्रवाह वळवणे आणि स्थलांतराचे काम पूर्ण होईल. सध्या विमानतळ प्रकल्पांतर्गत आव्हानात्मक काम आहे ते उलवे नदीचा प्रवाह वळवण्याचे. त्याचे कामही वेगाने सुरू आहे.
- अशोक शिंगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

नवी मुंबई विमानतळाची विकासपूर्व कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. स्थलांतराचे ८५ टक्के काम शिल्लक आहे. मोठा उलवे आणि कोंबडभुजे गावचे स्थलांतर पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अन्य कामेही वेगाने सुरू आहेत. 
- प्रिया रतांबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: last phase of the work for the airport