लातूर, चंद्रपूर, परभणीत मतदानाच्या वेळेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान

प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान
मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी 6.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

लातूरमध्ये कॉंग्रेस विरुद्ध भाजपमध्ये खरा सामना असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेनेही जोर लावला आहे. परभणीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना हे प्रमुख पक्ष आमनेसामने आहेत. चंद्रपूरमध्ये अन्य पक्ष रिंगणात असले, तरी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आहे.

सहारिया यांनी सांगितले, की चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकांच्या निवडणुकांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ ठरली होती. परंतु, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वेळ वाढविण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार एक तास वेळ वाढविण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर पुरेशी सावली आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा परिषदेचा दानापूर निवडणूक विभाग आणि अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा गणाच्या रिक्त पदासाठीही बुधवारी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी वाढत्या उष्म्यामुळे सायंकाळी 6.30 पर्यंत मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे, असे सहारिया यांनी सांगितले.

लातूर
70 - जागा
401- उमेदवार

परभणी
65 - जागा
418 - उमेदवार

चंद्रपूर
66 - जागा
460 उमेदवार

Web Title: latur chandrapur parbhani voting time increase