वाशी रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेतर्फे सिटी स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात या सुविधेचा शुभारंभ झाला.

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेतर्फे सिटीस्कॅन सुविधा सुरू करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात या सुविधेचा शुभारंभ झाला. या प्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आणि आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासहित नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. 

वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात रुमेडिको लिगल केसेस, ज्येष्ठ नागरिक, दारिद्य्ररेषेखालील (बी.पी.एल.) आणि सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबंधित नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण यांना ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या व तीन लाखांच्या वरील उत्पन्नधारकास केवळ ९८५ रुपयांत सिटीस्कॅन ब्रेन-प्लेन आदी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तीन लाखांच्या आतील उत्पन्नधारकास ५० टक्के कमी दरात ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे; तर नवी मुंबई शहराच्या बाहेरून येणाऱ्या रुग्णांना दीडपट अधिक शुल्कात सिटीस्कॅन सुविधा मिळणार आहे. 

बाहेरून सिटीस्कॅन करण्याची अट
नोव्हेंबर २०१७ पासून नगरसेवक देवीदास हांडे पाटील स्थायी समितीवर सदस्य असताना सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. तसेच अनेकदा सुविधा सुरू केल्यावर संबंधित संस्था या यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही सुविधा बंद होती. परंतु सिटीस्कॅनच्या बाबतीत असे होऊ नये याकरिता सिटीस्कॅन मशीन बंद पडल्यास संबंधित संस्थेला रुग्णाचे बाहेरून सिटीस्कॅन करून घेण्याची अट महापालिका प्रशासनाला घालण्यास भाग पाडल्याचे हांडे-पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of City Scan facility in Vashi