विधी अभ्यासक्रमाचे निकाल रखडले! विद्यापीठाकडून कारवाई नाहीच!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

  • दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा 
  • सत्र 2 आणि 3 च्या मुख्य परीक्षांचा निकाल अद्यापही जाहीर नाही

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न विधी महाविद्यालयांमार्फत गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेतलेल्या सत्र 2 आणि 3 च्या मुख्य परीक्षांचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही. महाविद्यालयांची मनमानी सुरू असतानाही विद्यापीठाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. महाविद्यालयांना तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन या संघटनेने केली आहे. 

हेही वाचा- दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक

विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाचे पहिल्या चार सत्रांच्या परीक्षांचे मूल्यांकन आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे पाच ते आठ सत्राच्या परीक्षांचे पेपर तपासण्याची आणि निकाल जाहीर करण्याची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांवर सोपवली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेनंतर 45 दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे, परंतु विद्यापीठाशी संलग्न बहुतांश महाविद्यालयांनी सत्र 2 आणि 3 मुख्य परीक्षेचे आणि एटीकेटी परीक्षांचे निकाल अद्यापही घोषित केलेले नाहीत. परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. निकालामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचे नियोजन करणे अवघड झाले आहे. 

हेही वाचा - कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले

निकाल पुढील तीन दिवसांत जाहीर करण्याचे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना द्यावेत, यासाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांची भेट घेतली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये निकाल जाहीर न झाल्यास विद्यापीठात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे महासचिव सुनील शिरीषकर यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Law Results geting delay! There is no action from the university