रेल्वेमध्ये वकिलांना प्रवेश नाहीच! राज्य सरकारने मागणी फेटाळली

रेल्वेमध्ये वकिलांना प्रवेश नाहीच! राज्य सरकारने मागणी फेटाळली


मुंबई : लाॅकडाऊन काळात वकिलांनाही रेल्वेमधून प्रवास करु देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणावरून रेल्वेगाड्यांची आणि प्रवाशांची संख्या मर्यादित असल्याने परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच, वकिलांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याची मागणीही नामंजूर केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली.  न्यायदानासाठी वकील वर्ग महत्त्वाचा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत गर्दी होऊ नये म्हणून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उपनगरातून अनेक वकिल न्यायालयात कामासाठी जात आहेत. त्यामुळे त्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड चिराग चैनानी यांनी अॅड शाम देवानी यांच्यामार्फत केली आहे. तसेच अन्य एक याचिकाही अॅड उदय वारुंजीकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे. त्यावर सरकारने हा खुलासा केला आहे. न्यायालयाने सरकारचे म्हण्णे नोंदवून घेतले आहे. 

वकिलांसह भारत पेट्रोलियम, माझगाव डौक, अदानी इलेक्ट्रिसिटी, न्यू इंडिया, एलआयसी, इंडियन पोस्ट, एमटीएनएल, टाटा पौवर, शहर न्यायालय आदी अठरा आस्थापनांनीही रेल्वे प्रवासासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र तूर्तास केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना परवानगी आहे. अन्य कोणाला नाही, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनीही स्पष्ट केले आहे. 

गैरसोयीपेक्षी आरोग्य महत्त्वाचे
मुंबई महानगर प्रादेशिक परिसरात 2 आॅगस्टपर्यंत 94,564 कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे कि काही घटकांची गैरसोय या दोन्हींमध्ये आरोग्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. लाॅकडाऊनची बंधने शिथिल होत असून प्रवासाची अन्य साधनेही उपलब्ध आहेत, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com