सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम

दिनेश गोगी
बुधवार, 12 डिसेंबर 2018

उल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले नाही तर, उल्हासनगर पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई केली जाणार'',असा इशारा आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.

उल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले नाही तर, उल्हासनगर पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई केली जाणार'',असा इशारा आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.

खेमाणी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. हेच पाणी पिण्याची वेळ उल्हासनगरकरांवर येते. अशा तक्रारी आमदारांनी विधिमंडळात केल्या होत्या.त्याअनुषंगाने खेमानी नाल्याची पाहणी करण्यासाठी रामदास कदम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आले होते. नाल्याचे सांडपाणी एका विहिरीत अडवण्यात येत असल्याने ते उल्हास नदीत जात नाही.ही जमेची आनंदाची बाजू असल्याचे समाधान कदम यांनी व्यक्त केले. मात्र या विहिरीतील सांडपाणी पाईपाद्वारे विठ्ठलवाडी जवळच्या वालधुनी नदीत प्रक्रिया विनाच सोडले जाते. ही नदी अगोदरच प्रदूषित व अस्वच्छ असून त्यात आता सांडपाण्याचा भर पडला आहे. याबाबत उल्हासनगर पालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याकडून सांडपाण्याच्या प्रक्रिया बद्दल आढावा घेतला जाणार आहे. प्रक्रिये बाबत गांभीर्य दाखवले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह संचालक सोनटक्के, कदम, कल्याणचे अधिकारी धनंजय पाटील, मंचक जाधव, अंबरनाथचे मुख्याधिकारी देविदास पवार, उल्हासनगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता कलई सेलवन उपस्थित होते. याबाबत कलई सेलवन यांच्याशी विचारणा केली असता, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून त्याचे काम प्रगती पथावर आहे. हे काम जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कलई सेलवन यांनी दिली.
 

Web Title: Legal action on the Commissioner for not taking action on sewage disposal : Ramdas Kadam