वसईच्या हर्षालीची लेह पर्वतावर सायकलस्वारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

किलिमांजरोनंतर १८,३८० फूट शिखर सर करणारी एकमेव हिरकणी 

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा 
मुंबई : वसईच्या एका कन्येने केनियाच्या सीमेजवळील आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलिमांजरो शिखर (१९,३४१ फूट) पार केल्याचे तुम्ही वाचले आणि दूरचित्रवाणीवरून पाहिले असेलच. हो! बरोबर नाव ओळखलेत- हर्षाली वर्तक. "युथ हॉस्टेल ऑफ असोसिएशन' (YHAI )च्या मनाली-खारदुंग-लेह या सायकल मोहिमेत "सह्याद्रीची हिरकणी' म्हणून ओळख आणि एकमेव मुलगी असलेल्या हर्षालीने भारताचे प्रतिनिधित्व केले. या वेळी तिने १० दिवसांत ५,३६० मीटरचा प्रवास केला. 
या सायकल मोहिमेत भारतातून एकूण ९२ सायकलपटू सहभागी झाले होते. गिर्यारोहक हर्षालीने रोमांचक प्रवास करत सह्याद्री रांगेतील लोहगड, हरिश्‍चंद्रगड, कळसूबाई, नाणेघाट, राजगड, तोरणा, कलावंतीण अशी अनेक पर्वतशिखरे जिद्दीने सर केली आहेत. माऊंट किलिमांजरो हे केनिया देशाच्या सीमेजवळील शिखर सर करून तिने आपल्या गिर्यारोहण कामगिरीला "चार चॉंद' लावले आहेत. उंचच उंच पर्वतरांगा चढताना अनेक अनुभव गाठीशी बांधत जिद्दीने तिने प्रवास केला आहे आणि सह्याद्री-हिमालयातील मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. 
हर्षालीने एन.आय.एम (Nim) या संस्थेकडून माऊंटेनियरिंगची पदवी "अ' श्रेणीमध्ये पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातही सर्व कानाकोपऱ्यांत गिर्यारोहण केले आहे. त्यातच आता तिला सायकलवरून मनाली-खारदुंगला-लेह सायकल मोहिमेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि तिनेही आयोजकांना होकार दिला. या मोहिमेत खडतर प्रवास अनुभवायला मिळाला; मात्र त्यात आनंद मिळाला. सकारात्मक विचारसरणी या सायकल मोहिमेत मला कामी आली, अशी प्रतिक्रिया हर्षालीने नावाप्रमाणेच हर्षभरीत होऊन व्यक्त केली. सुरुवातीला ९२ जण एकत्र सायकलने निघून लेह येथे पोहचले. त्यानंतर ७७ जणांनी खारदुंगपर्यंत प्रवास केला. त्यातून फक्त १८ हजार ३८० फुटांच्या शिखरावर १७ जणच पोहचले आणि त्यात हर्षाली एकमेव मुलगी होती. तिच्या या जिद्द आणि साहसाचे वसई तालुक्‍यातून कौतुक होत आहे. 

चौकट 
भारतातील ९२ सायकलपटू या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला आयोजकांनी दिली याचा अभिमान वाटतो. शिखरावरील मार्गात अनेक अडथळे होते; परंतु ते पार करत मी पुढे गेली. त्या सर्वांमध्ये मी एकटीच मुलगी होती. सायकल व चालणे यामुळे आपण सुदृढ राहतो. त्यामुळे प्रत्येकाने थोड़ा वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. 
- हर्षाली वर्तक, गिर्यारोहक, वसई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leh mountain girl harshali ride on cycle