कर्जत जंगलात बिबट्यांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

मुंबई : कर्जत तालुक्‍यातील अंभेरपाडा येथे 12 शेळ्या आणि गाईचा फडशा बिबट्याने पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जतच्या जंगलात तीन बिबटे असावेत, अशी शक्‍यता खांडस पूर्व विभागाचे वनाधिकारी राजेंद्र कुमार आर्डे यांनी व्यक्त केली. 
मागील आठवड्यात अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी येथे प्रकाश पारधी यांच्या 12 शेळ्या आणि गाईची वन्यप्राण्यांनी शिकार केली.

वन अधिकाऱ्यांनी या प्राण्यांचा मागोवा घेण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी भरपावसातही जंगल भागातील गस्त वाढवली होती. काठ्याची वाडी येथील डोंगरउतारावरील घनदाट जंगलात कंदमुळे, रानभाज्या गोळा करणाऱ्या आदिवासींना तीन बिबटे दिसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे अंभेरपाड्यावरील बकऱ्या आणि गाईची शिकार याच बिबट्यांनी केली असावी, असा निष्कर्ष त्यांनी काढला. बिबटे एकटे राहणे पसंत करतात. त्यामुळे हे तीन बिबटे म्हणजे मादी आणि बछडे असावेत, असे सांगितले जाते.

बकऱ्यांच्या शिकारीमुळे ग्रामीण भागात भीती पसरली आहे. त्यातच जंगल भागात तीन बिबट्यांचा वावर असल्याचे समजल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बहुतेक आदिवासी शेतकरी बकऱ्या, कोंबड्या पाळतात. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्यांपासून मानवी जिवालाही धोका पोहोचू शकतो. बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्‍यता म्हणजे परिसरातील ग्रामस्थांसाठी धोक्‍याची घंटा असली, तरी व्यापक विचार केल्यास वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. 

बिबट्यांवर ही वेळ का? 
जंगलात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. अनिर्बंध जंगलतोड होत असून, घरे आणि बेकायदा फार्महाऊस अशी बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. पूर्वी जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असे. रानडुक्कर, ससे आणि अन्य वन्य प्राण्यांची शिकार झाल्यामुळे बिबट्यांना जंगलात भक्ष्य मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बिबटे भक्ष्याच्या शोधात वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांची शिकार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopar in Karjat forest